मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वत्र वेतनकपात आणि कर्मचारी कपातीचे वारे सुरू असताना विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी स्वत:च्याच वेतनात एक, दोन नव्हे तर पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची कॉर्पोरेट जगतात बरीच चर्चा आहे.
विप्रो कंपनी सुरुवातीपासून सामाजिक दायित्व निभावण्यात अग्रेसर राहिली आहे. अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. कुटुंबात असलेला हा सामाजिक दृष्टीकोन नवीन पिढीनेदेखील आत्मसात केला आहे. याच अंतर्गत रिशद प्रेमजी यांनी स्वत:च्या वेतन कपातीचा मोठा निर्णय घेतला आहे.
अमेरिकी प्रतिभूती आणि विनिमय आयोगाला अलीकडेच सादर करण्यात आलेल्या दस्तावेजानुसार, या आर्थिक वर्षात रिशद प्रेमजी यांना एकूण ७.८७ कोटी रुपये एवढा मोबदला मिळला. आदल्या वर्षाच्या तुलनेत तो ५० टक्के (८, ६७, ६६९ डॉलर) कमी आहे. विप्रोद्वारा ‘युनायटेड स्टेट्स सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशन’ला सादर करण्यात आलेल्या फॉर्म २०- एफ’ नुसार, रिशद प्रेमजी यांना वेतन व भत्त्याच्या स्वरुपात ८,६१,६२० डॉलर मिळाले.
दीर्घकालीन मोबदल्याच्या स्वरूपात ७४, ३४३ डॉलर आणि अन्य उत्पन्नाच्या स्वरूपात १५,३९० डॉलर मिळाले. प्रेमजी यांच्या वेतनात रोख बोनसचाही समावेश होता. रिशद यांनी कमी मोबदला घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी कोरोना महामारीच्या वेळेस कमी मोबदला घेतला होता.
कामाचा दीर्घ अनुभव
रिशद प्रेमजी यांनी यापूर्वी विप्रोमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २०१९ मे मध्ये कार्यकारी अध्यक्ष झालेत. ते २००७ पासून विप्रोमध्ये कार्यरत आहेत. येत्या ३० जुलै २०२४ रोजी कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची मुदत संपणार आहे. त्यांनी यापूर्वी कंपनीच्या बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस व्यवसायात सरव्यवस्थापक म्हणून त्यांनी कामाला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टर्स रिलेशन्सचे नेतृत्व केले. त्यानंतर ते कंपनीच्या रणनीती आणि विलीनीकरण व अधिग्रहण विभागाचे प्रमुख बनले.
Wipro Chairman Rishad Premji Salary Cut