मुंबई – हिवाळा सुरू होताच, केस गळणे आणि कोरडी त्वचा यासारख्या समस्यांमुळे अनेकांना त्रास होऊ लागतो. त्यातून आराम मिळवण्यासाठी कधी केसगळतीविरोधी शॅम्पू, कधी कॉस्मेटिकपासून ते सप्लिमेंट्सपर्यंत सगळेच प्रयत्न करतात. मात्र त्याचा केसांवर किंवा चेहऱ्यावर कोणताही चांगला फरक नाही. केस गळणे किंवा कोरडी त्वचा यासारख्या समस्यांनी त्रस्त असल्यास तर हिवाळ्यात हवेत बदल होताच या ५ प्रकारच्या तेलांचा समावेश करावा, त्याचा फायदा होऊ शकतो.
मोगरा तेल
केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी मोगरा तेल खूप फायदेशीर मानले जाते. काही आरोग्य तज्ज्ञ मोगरा तेलाचा वापर स्नायूंमध्ये होणारा त्रास कमी करण्यासाठी देखील शिफारस करतात. केसगळती दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा मोगरा तेल गरम करून टाळूची मालिश करावे.
देवदार तेल
त्वचा सुंदर ठेवण्यासाठी देवदाराच्या तेलाचा वापर करा. या तेलाचा वापर केल्याने त्वचा लवकर सैल होत नाही. रोज सकाळी आंघोळीच्या एक तास आधी देवदाराच्या तेलाने संपूर्ण शरीराला मसाज करा.
दालचिनीचे तेल
आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर दालचिनीचे तेल वापरणे सुरू करावे, तसेच वयाच्या आधी चेहऱ्यावर दिसणाऱ्या बारीक रेषा हे तणावाचे लक्षण आहे. हा ताण कमी करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे तेल डोक्याला आणि चेहऱ्यावर लावा. हे तेल चिंताग्रस्त ताण कमी करण्यास मदत करते आणि स्मरणशक्ती वाढवते.
हळदीचे तेल
अँटिसेप्टिक गुणांनी युक्त हळदीच्या तेलाने मसाज केल्याने त्वचा चमकदार होते. हळदीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात आणि मुरुम, डाग आणि त्वचेशी संबंधित इतर समस्यांवर अगदी अचूकपणे कार्य करतात.
गाजर तेल
तुमच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असल्यास गाजराच्या तेलाने त्या भागाची मालिश करा. या तेलाने मसाज केल्याने संसर्ग आणि जखमांवर आराम मिळतो. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट टिश्यूजमधील झीज दुरुस्त करतात आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.