नाशिक – कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी, गहू व रब्बी मका बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
सदर अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच लक्षांकपूर्तीसाठी ऑफलाइन पध्दतीने शेतकरी निवडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात हरभरा 8016 क्विंटल, गहू 3290 क्विंटल, ज्वारी 70 क्विंटल व मका 433 क्विंटल इतक्या अनुदानित बियाण्यांचे तालुकानिहाय वितरणासाठी नियोजन करण्यात आले आहे. 10 वर्षे आतील प्रमाणित हरभरा बियाणे (फुले विक्रम, RVG -202) साठी प्रति किलो रुपये 25 अनुदान, रब्बी मका पिकासाठी रुपये 95 प्रति किलो किंवा किमतीच्या 50 टक्के अनुदान, रब्बी ज्वारी रुपये 30 प्रति किलो अनुदान तसेच ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा (फुले विक्रम, RVG-202, जॅकी-9218) साठी प्रति किलो रुपये 25 अनुदान, गहू (फुले समाधान, लोकवन व एच.डी.2189) पिकासाठी प्रति किलो रुपये 16 अनुदान या प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे महाबिज व राष्ट्रीय बीज निगम यंत्रणेकडील वितरकांमार्फत तालुकास्तरावर परमिटद्वारे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रासाठी अनुदानित बियाण्याचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व 7/12 उताऱ्याच्या झेरॉक्स प्रतीसह तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून परमिट मिळवून अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.