नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कडाक्याच्या थंडीने जनावरांनाही हाल सोसावे लागतात. विशेषतः ज्या जनावरांवर शेती व्यवसाय अवलंबून आहे, त्यांना थंडीचा तडाखा बसू नये, याची फार काळजी घ्यावी लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील पशुपालक शेतकरी एका विशिष्ट्य गोष्टीने चिंताग्रस्त आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे व सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे दूध उत्पादन घटण्याची भिती त्यांना वाटू लागली आहे.
जनावरांना गेल्या काही महिन्यांपासून लम्पी आजाराने ग्रासले आहे. यातून कसेबसे सावरण्याचा प्रयत्न झाला असतानाच वातावरणात अचानक बदल झाले. मध्ये काही दिवस ढगाळ वातावरण होते. काही भागांमध्ये तुरळक पावसानेही हजेरी लावली. अश्यात तापमान अचानक घसरले आणि कडाक्याची थंडी पडू लागली. या वातावरण बदलाचा गुरांवर परिणाम होऊ लागला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे गुरांना विविध आजारांची लागण होण्याची भिती व्यक्त होत आहे. लम्पीतून सावरलेल्या गुरांना विषाणूजन्य आजारांनी विळखा घातला तर जनावरांना मृत्यूचा सामना करावा लागेल, अशी भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. तसे झाले तर दूध उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. कारण आत्ता सुद्धा लम्पी व इतर आजारांमुळे दूध उत्पादनावर परिणाम झालेलाच आहे. पण थंडी अशीच वाढत राहिली तर इतर विषाणूजन्य आजारांसोबत लम्पीचा फैलाव देखील मोठ्या प्रमाणात होईल, असे पशूवैद्यक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जनावरांचे विलगीकरण
जनावरांना लम्पीची लागण झाल्यास किंवा विषाणूजन्य आजाराने विळखा घातल्यास संबंधित जनावरांचे विलगीकरण करावे लागेल. जेणेकरून इतर जनावरं आजारांपासून सुरक्षित राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दोनच महिने काळजीचे
दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोनच महिने जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. एकतर कडाक्याची थंडी याच कालावधीत पडते. त्यामुळे अनेक विषाणूजन्य आजारांचा जनावरांना विळखा बसतो. या कालावधीत अश्या आजारांची साथच असते.
तर दूर उत्पादन घटणार
लम्पी आजारामुळे गुरांना तोंडखुरी व पायखुरी अश्या आजारांनी हल्ला केला. यात जनावरं चारा-पाणी बंद करतात. त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. थंडी अशीच वाढत राहिली तर उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी थंडीमुळे राज्यातील दूध उत्पादनात २० ते ३० टक्क्यांनी घट होते.
Winter Cold Lumpi Skin Disease Milk Production Rate
Animals Fear Fever Hike