अयोध्या – अयोध्येतील राम मंदिरासाठी ७० एकराची जागा निश्चित करण्यात आली आहे. पण, या जागेला वास्तूदोषापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नात असलेल्यांना ७० एकर जागा मंदिरासाठी प्रतिकुल असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आसपासची आणखी जागा खरेदी करण्यासाठी ट्रस्टचे प्रयत्न सुरू आहेत.
राम मंदिराचे निर्माण कार्य आता वेगाने सुरू आहे. याठिकाणी पुजा-अर्चना तर सुरू आहेच, शिवाय या परिसराचे मोजमापही वास्तूदोषाच्या अनुशंगाने व्यवस्थित केले जात आहे. त्यासाठी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट मंदिराच्या आसपासची जागा खरेदी करण्यासाठी तयारी करीत आहे. आतापर्यंत ४ एकर जागेची खरेदी झालेली देखील आहे. मंदिर निर्माणातील वास्तूदोष दूर करण्यासाठी परिसरात पूर्वोत्तर व पश्चिम दिशेकडे अधिकची जागा आवश्यक आहे. ट्रस्टने आता सर्वांत पहिले हेच काम प्राधान्याने हाती घेतलेले आहे. नवी जागा खरेदी करून या परीसराला आयाताकृती किंवा चौरस आकार देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. फकीरेराम मंदिराला परिसराचा भाग बनविण्यात आले आहे. आता सध्यस्थितीत ५ एकर जागेवर राम मंदिर निर्माणासाठी पाया रचण्याचे काम सुरू आहे. विस्तारित क्षेत्रात एकूणच प्रकल्प विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. या विस्ताराची जबाबदारी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
३० कोटी रुपयांमध्ये खरेदी
आतापर्यंत श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टने रामकोट परीसरातील चार एकरासह एकूण सात एकर जागा खरेदी केली आहे. यातील तीन एकर दुसऱ्या भागातील आहे. या संपूर्ण सात एकर जागेत १४ भूखंड आहेत. सात एकर जागेसाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
अनुभवी अभियंते कामाला
राम मंदिर निर्माणासाठी अनुभवी अभियंते कामाला लागले आहेत. ट्रस्टने विशिष्ट लोकांची निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. ते पूर्णपणे झोकून काम करीत असून त्यांच्या निवासाची व्यवस्थाही राम मंदिर परिसरातच करण्यात आली आहे.