मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील राजकीय क्षेत्रात उलथापालथ होत आहे. अद्यापही राजकारणात अनेक घडामोडी घडतच आहेत. शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच, शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यातच आता एक जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडणार. सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.य
विशेषतः नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. या चर्चेवर आता अशोक चव्हाण यांनीच खुलासा केला आहे. खरेतर विधानसभेत बहुमत चाचणी ठरावावेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर राहिले. त्यात अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे यांच्यासह इतर आमदारांचा समावेश होता. या गैरहजर आमदारांवर कारवाई करणार असल्याचे समोर येत आहे. त्यात अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू झाली. त्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, मी काँग्रेसमधून बाहेर पडणार असा कुठलाही निर्णय घेतला नाही. चर्चेला काही महत्व नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाणांना भाजपा प्रवेशाची ऑफर दिली. अशोक चव्हाण यांनी बहुमत चाचणीला गैरहजर राहून एकप्रकारे भाजपाला मदत केली. शिवाय बहुमत चाचणीला अशोक चव्हाण यांनी ४ आमदारांना गैरहजर ठेवले. त्यामुळे त्यांचे आभार मानणे माझे काम आहे. अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्यास त्याचे स्वागतच करू असे प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटले आहे.
विधानसभेत बहुमत चाचणीवेळी शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यात काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अदृश्य हाताने जी मदत केली त्यांचेही आभार मानले. तर आम्हाला फक्त २-३ मिनिटे उशीर झाला. आम्ही लॉबीत होतो तेव्हा विधानसभेचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मविआच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे संभ्रम निर्माण करू नका. आमच्यात कुणीही नाराज नाही, असे चव्हाणांनी सांगितले होते.
अशोक चव्हाण यांनी स्वतः स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, मी पक्ष सोडण्याचा कुठलाही निर्णय घेतला नाही. तसेच जिल्हाभरात सुरु असलेल्या चर्चांना मी महत्व देखील देत नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी या विषयावर जास्त भाष्य करण देखील टाळलं आहे. दरम्यान, बहुमत चाचणीच्या वेळी अशोक चव्हाण अनुपस्थितीत होते. त्यावरून काँग्रेस पक्षातूनच त्यांची कोंडी केली जात आहे, त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा स्वतः अशोक चव्हाण यांनीच फेटाळून लावली असली तरी अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची जिल्हाभरात चर्चा आहे हे मात्र नक्की.
यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी सांगितले की, विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेस पक्षाचे आमदार आज उपस्थित राहिले नाहीत, याबाबत अचंबित व्हायची गरज नाही. आम्हाला फक्त दोन ते तीन मिनिटांचा उशीरा झाला. आम्ही लाॅबीत होतो, तेव्हा त्यांनी विधानसभेचे दरवाजा बंद केले. याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले होतेच. संभ्रम निर्माण करू नका. आमच्यामध्ये कुणीही नाराज नाही.
अशोक चव्हाण हे ८ डिसेंबर २००८ ते ११ नोव्हेंबर २०१० या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याआधी ते सांस्कृतिक, उद्योग, खाण या खात्यांचेही मंत्री होते. चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र २०१० मध्ये आदर्श हाउसिंग सोसायटी प्रकरणी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते.
Will Senior Leader Ashok Chavhan Leave Congress