विशेष प्रतिनिधी, मुंबई
अरबी समुद्रात आलेले तौत्के चक्रीवादळ आणि आता बंगालच्या उपसागरात येऊ घातलेले चक्रीवादळ याचा मान्सूनवर परिणाम होणार का, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच सतावतो आहे. चक्रीवादळांमुळे मान्सून रेंगाळणार का, या प्रश्नाचे उत्तर भारतीय हवामान विभागाने अखेर दिले आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, अंदमानच्या समुद्रात मान्सूनच्या हालचाली आज दिसून आल्या आहेत. मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. दक्षिण पश्चिम बंगाल उपसागरातील या वातावरणामुळे मान्सून यंदा भारताच्या वेशीवर वेळेवरच धडकणार आहे. येत्या ४८ तासात मान्सूनचा खरा प्रवास पहायला मिळेल. त्यामुळे येत्या ३१ मेच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. या खुलाशामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, मान्सूनला भारताचा अर्थमंत्री म्हटले जाते. मान्सूनच्या आगमनामुळे अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम पहायला मिळणार आहेत.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1395668708802973697