पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेले देवेंद्र फडणवीस हे २०२४ साली पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याविषयी भाजपच्या गोटातून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. फडणवीस हे नागपूरचे असून ते पुण्यातून का निवडणूक लढविणार, मग, भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापटांचे काय होणार यासह अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास मला कोणताही आक्षेप नाही, असे गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे. ते पुढे म्हणाले की, राजकीय पक्षाची उमदेवारी कोणाला द्यायची याचा निर्णय प्रमुख नेते घेतात. त्यासाठी एक यंत्रणा असते, अध्यक्ष असतात, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवू लागल्या तर पेच निर्माण होऊ शकतो. खरे म्हणजे त्यांचा रोख अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडे होता. या संघटनेने योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यावा. पण देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला कोणतीही अडचण नाही. उलट फडणवीस पुण्यातून उभे राहिल्यास मला आनंदच होईल, असा गिरीश बापट यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून फडणवीस यांना पुण्यातून लोकसभा उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या पत्रात ब्राह्मण महासंघाने फडणवीस यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे. फडणवीस हे कुशल राजकीय व्यक्तिमत्व असून तिला पाच वर्षात त्यांनी हे सिद्ध केल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यात सत्ता नाट्य झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांना एक पाऊल मागे यावे लागले असले तरी हा प्रारंभ आहे. पुण्यातून त्यांना उमेदवारी दिल्यास अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेईल, असे देखील या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या पत्राची आता उलट सुलट चर्चा सुरू आहे. तसेच, फडणवीस हे राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका बजावू शकतात, असेही अनेकांना वाटते.
Will Devendra Fadanvis Contest Loksabha Election from Pune
Politics Girish Bapat