इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विकीलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजने लंडनमधील बेलमार्श तुरुंगात आपल्या वकीलसोबत लग्न केलं. ज्युलियन असांज आणि स्टेला मॉरिस यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. लंडनमधील बेलमार्श तुरुंगात असांज शिक्षा भोगत असून, तिथे लग्न करण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. ती मिळाल्यानंतर लग्नसोहळा पार पडला. विशेष म्हणजे, स्टेला ही ज्युलियन पेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान आहे.
याविषयी मॉरिस हिने मीडियाला माहिती दिली आहे. ती म्हणाली, “आमच्या दोन मुलांचे वडील, माझा नवरा एक अद्भुत माणूस, हुशार आणि मजेदार आहे. त्याला योग्य काय आणि अयोग्य काय याची तीव्र जाणीव आहे. एक धाडसी प्रकाशक म्हणून तो जगभरात ओळखला जातो. आमच्या प्रेमाला आम्ही आज लग्नाचं नाव देत आहोत.“ यावेळी ती असांजचे वडील रिचर्ड व आपल्या दोन मुलांसह तुरुंगात पोहोचली होती. तुरुंगाच्या कठोर नियमांचे पालन करुन हा लग्नसोहळा संपन्न झाला.
https://twitter.com/wikileaks/status/1506643037606326273?s=20&t=8UGBpsTgUMRWZFdotIpqIg
मॉरिसने ब्रिटिश फॅशन डिझायनर व्हिव्हिनी वेस्टवुडने डिझाइन केलेला पांढरा लिलाक सॅटिन ड्रेस परिधान केला होता. या जोडप्याने लग्नाचा खर्च स्वत: उचलल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी, लग्नात भेटवस्तू देण्याऐवजी या जोडप्याने असांजसाठी देणगी देण्याचे आवाहन आपल्या मित्रपरिवाराला केले होते. जेणेकरून त्याची तुरुंगातून सुटका करता येईल.
ऑस्ट्रेलियन संपादक, प्रकाशक आणि कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे असांज २०१९पासून या लंडन तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मॉरिस असांजपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. २०११ मध्ये त्याची भेट झाली. तेव्हा ती त्याच्या कायदेशीर टीममध्ये काम करत होती. मात्र, चार वर्षांनंतर म्हणजेच २०१५ मध्ये दोघांचे नाते सुरु झाले. तसेच, दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले ५० वर्षीय असांज आणि त्यांची मैत्रीण स्टेला मॉरिस (३८) यांना दोन मुलगे आहेत. कथितपणे गोपनीय कागदपत्रे लीक केल्याच्या आरोपाखाली अमेरिकेन कायद्यानुसार ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.