विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पत्नीच्या हत्येप्रकरणी दोन दशकांपूर्वी तुरुंगात टाकलेल्या तिच्या पतीची आणि त्याच्या भावाची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, केवळ पत्नी आवडत नाही म्हणूनच तिचा खून करण्याचा कट रचला गेला, असा निष्कर्ष पूर्णपणे स्वीकारणे योग्य नाही आणि सर्व आरोपींचे विचार असे होते. तसेच हेतू देखील समान असल्याचे सिद्ध करणारे पुरावे सादर करण्यात खटला अपयशी ठरला. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूच्या खटल्यातून पती आणि अन्य व्यक्तींना निर्दोष सोडण्याचा आदेश न्यायालय देत आहे.
याप्रकरणी न्यायालयाने म्हटले आहे की, गुन्ह्याकडे पाहण्यासाठी सार्वत्रिक अनुभव योग्य नाही आणि केवळ अनुमानानुसार निष्कर्ष काढू नये. न्यायमूर्ती आर.एफ. नरिमन, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला. याप्रकरणी मृत महिलेचे मेहुणे सुरेंद्र कुमार आणि मृत महिलेचा पती रणवीर यांनी सदर महिलेला म्हणजे कमला राणीला ठार मारले, असा आरोप आहे. यावर न्यायालयाने म्हटले आहे की, रणवीर कदाचित आपल्या पत्नीवर खूष नसेल पण या प्रकरणात हे सिद्ध झाले नाही की, त्यांनी कमला राणीच्या हत्येचा कट रचला होता.
तसेच न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, जरी व्यक्तीचे म्हणणे स्वीकारले गेले तरी त्या व्यक्तीला ठार मारण्याच्या कट रचण्याचा हेतू सिद्ध करता आलेला नाही. तसेच फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ८ ऑगस्ट १९९३ रोजी कमला राणी ही तिचे मेहुणे सुरेंद्र समवेत स्कूटरवरून परत येत होती. त्यावेळी रस्त्यात दोन सशस्त्र बदमाशांशी त्यांचे भांडण झाले आणि त्यांनी कमला राणीला पकडले. रस्त्याच्या कडेला शेतात नेऊन तिला गोळी मारली आणि दागिने लुटले. दरम्यान, या उलट दुसऱ्या बाजूला कमला राणीच्या सासरच्यांनी तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवला होता. त्या आधारे पती आणि मेहूणे यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तिघांना औपचारिकरित्या कट आणि हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, जेव्हा या घटनेत सशस्त्र दरोडेखोरांशी सामना केला असे सांगण्यात येते, तरीही त्यात कोणी जखमी झाले नाही. परंतु त्यावरून काही निष्कर्ष काढता येणार नाही. त्यामुळे या खटल्यातून पती आणि अन्य व्यक्तींना निर्दोष सोडण्यात येत आहे.