विशेष प्रतिनिधी, पुणे
राज्यासह देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू असले तरी लसीचा मोठा तुटवडा आहे. आता देशातील युवकांना लस दिली जाणार असताना लसच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण बारगळले आहे. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. लसीचा नेमका तुटवडा का आहे, हे पवार यांनी सांगितले आहे. पवार म्हणाले की, भारतात तयार झालेली लस परदेशात पाठविण्यात आली. त्यावेळी जर हिच लस भारतातील नागरिकांना दिली गेली असती तर आज ही टंचाई निर्माण झाली नसती, असे पवार यांनी सांगितले. पण, आता जे झालं ते जाऊ द्या. देशाला आवश्यक असलेली लस योग्य प्रमाणात आयात झाली तरी प्रश्न सुटेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लसीच्या तुटवड्याबद्दल भाष्य केले.