अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा मेगा लिलाव नुकताच पार पडला असून, मुंबई इंडियन्स या संघाने अर्जुन तेंडुलकरवर ३० लाखांची बोली लावत त्याला खरेदी केले आहे. असे असले तरी, सचिन तेंडुलकर मात्र मुलाचा, अर्जुनचा खेळ, सामने बघत नसल्याचे समोर आले आहे. याचे कारण स्वतः सचिन तेंडुलकरने सांगितले आहे.
सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे. जगभरात त्याचे चाहते आहे. आता त्याचा मुलगा अर्जुनही या खेळात सक्रिय झाल्याने लोकांच्या त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. मात्र, त्याला कोणाच्याही अपेक्षांचे ओझे होऊ नये, यासाठी सचिन त्याचे सामने बघत नसल्याचे समोर आले आहे. मास्टर ब्लास्टरने शेअर केले आहे की, “जेव्हा पालक आपल्या मुलाला खेळताना पाहतात तेव्हा त्याचा मुलांवर दबाव येतो. त्यामुळे मी अर्जुनचे सामने प्रत्यक्ष बघण्याचे टाळतो. त्याला क्रिकेट खेळताना पूर्ण स्वातंत्र्य असावे, क्रिकेटवर त्याचे प्रेम असावे आणि त्याला आवडेल त्या पद्धतीने खेळावे, त्यावर लक्ष केंद्रित करावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी त्याचा खेळ बघायला जात नाही. गेलो तरी कुठेतरी लपून बसेन. जेणे करुन मी तिथे आहे हे अर्जुनला कळणार नाही.”
याबरोबरच, “आमच्यापैकी कोणीही अर्जुनला क्रिकेट खेळण्यास भाग पाडले नाही. तो फुटबॉल खेळायचा आणि नंतर त्याला बुद्धिबळ खेळायला आवडायचे. पण त्याच्या आयुष्यात क्रिकेट आले आणि तो त्यातच रमला”, असेही सचिन तेंडुलकरने सांगितले आहे. सचिन आपल्या मुलाला गोलंदाजीच्या उत्तम प्रशिक्षणासाठी इंग्लंडला घेऊन गेला होता. अर्जुनने इंग्लंड क्रिकेट संघाच्या फलंदाजांसोबत भरपूर सराव केला आहे. यंदा आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू आहे. बँगलोरमध्ये झालेल्या मेगा लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना खरेदी केले आहे.