मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर सलग बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू असून, रशिया माघार घेणार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी किव्ह आणि खाराकिव्ह या शहरांवर विमाने आणि रणगाड्यांद्वारे तुफान बॉम्बहल्ले केले. या हल्ल्यात काल नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रशिया आता रहिवासी ठिकाणांवरही हल्ले करत असून, त्याला युक्रेनचे सामान्य नागरिक विरोध करत आहेत. अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांनी रशियाच्या सैन्याचा रस्ता अडवून विरोध दर्शवला. रशियाने गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले वाढवले आहेत. युक्रेनच्या प्रमुख पाच शहरांवर रशियाकडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. ती शहरे कोणती आहेत हे जाणून घेऊ.
किव्ह
युक्रेनची राजधानी किव्ह हे प्राचीन शहर आहे. या शहरात आधुनिक रशिया आणि युक्रेन अशा दोन्ही संस्कृतीची झलक दिसून येते. किव्ह हे शहर प्राचीन चर्च आणि मठांच्या सुवर्ण घुमटांसाठी ओळखले जाते. १९९१ पासून युक्रेनची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किव्हची लोकसंख्या २.९ दशलक्ष आहे. किव्हने २००१ साली आपला १५०० वा वर्धापनदिन साजरा केला होता. किव्हमधील १६व्या शतकातील किव्ह-पेचेर्स्क लावला मोनेस्ट्री यासह सेंट सोफिया हे चर्च दोन्हीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहेत. किव्हमधील सर्वात मोठे सेंट्रस इंडिपेंडेंस स्क्वेअर ज्याला मैदानाच्या नावाने ओळखले जाते. हे मैदान प्रोयुरोपीयन बंडखोरांचे केंद्र राहिले आहे. रशियाने या शहराला चारही बाजूने वेढा घातला आहे. या देशाचे सरकार येथूनच चालते. तेथील सरकार उलथवण्यासाठी रशियाला किव्हला ताब्यात घ्यायचे आहे.
खाराकिव्ह
हे युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. हे शहर रशियाच्या सीमेपासून फक्त ४० किलोमीटर दूर आहे. १.४ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या खाराकिव्हमध्ये रशियन भाषा बोलली जाते. रशियाच्या सैन्याने या शहरावर तुफान बॉम्बवर्षाव केला आहे. द्वितीय महायुद्धादरम्यानही हे शहर उद्ध्वस्त झाले होते. २०१४ सालानंतर हे शहर जवळच्या डोनबास परिसरात सुरक्षा दल आणि रशिया समर्थित बंडखोरांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षामुळे पलायन केलेल्या हजारो नागरिकांचे घर झाले आहे. डोनबासच्या जवळ असल्याने रशियाला या शहराचा ताबा हवा आहे. डोनबासला रशियाने नुकतीच मान्यता दिली असून, त्यांचा फायदा करून देण्याचा रशियाचा उद्देश आहे.
मारियोपोल
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आजोव्ह सागर येथे असलेल्या प्रमुख बंदरांपैकी मारियोपोल या शहरावरही मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत. २०१४ मध्ये किव्हविरोधात बंडखोरीची सुरुवात डोनेटस्कपासून सुरू करून रशिया समर्थक फुटीरवाद्यांनी मारियोपोलवर ताबा मिळवला होता. तथापि, नंतर युक्रेनी सैन्यानी हा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. ४,४१,००० लोकसंख्या असलेले हे शहर फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील क्षेत्र आणि क्रिमिया बंदराच्या मधोमध स्थित आहे. २०१४ साली रशियाने क्रिमियाला ताब्यात घेतले होते. रशियन फौजांनी मंगळवारी फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. क्रिमियाजवळ असल्याने या शहरावर ताबा मिळवणे रशियासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
बर्डियांस्क
क्रिमियापासून पुढे गेल्यावर रशियाने सोमवारी आजोव्ह सागर येथील बर्डियांस्कच्या बंदरावर ताबा मिळवण्याचा दावा केला आहे. १,१५,००० रहिवाशांचे हे शहर समुद्रकिनारा, मड बाथ म्हणजे मातीतील स्नानासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या शहराला भेट देतात. मारियोपोलच्या किनाऱ्यापासून ८४ किलोमीटर दूर आहे.
खेरसॉन
खेरसॉन शहराला रशियाच्या सैन्याने वेढा दिला आहे. हे शहर निपर नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील रणनीतीक बंदर आहे. क्रिमिया द्वीपकल्पाच्या रणनीतीसाठी हे शहर महत्त्वाचे मानले जाते. हे शहर एकेकाळी काळा समुद्राजवळील रशियाचे तळ होते. या शहरावर ताबा मिळवल्यानंतर रशियासाठी ओडेसा शहराचा रस्ता आपोआप खुला होईल. या शहरात रशियाई भाषा बोलणारे बहुसंख्य नागरिक आहेत. या शहराला लागून असलेली सीम नाटो सदस्य असलेल्या रोमानिया आणि माल्दोवा या देशांशी मिळते. या शहराची २ लाख ८७ हजार लोकसंख्या आहे.