मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (१ मे) रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील ध्वनिक्षेपक काढण्यासाठी दिलेला अंतिम इशारा आणि त्यावरून तापलेल्या राजकारणामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज यांची सभा औरंगाबादमधील मराठवाडा सास्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. तीन दशकांपूर्वी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या मैदानावर सभा घेतली होती. त्यानंतरचा इतिहास सर्वांना ठाऊक आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ या वर्षी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या मंचावरूनच त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. या सभेत त्यांनी जनतेला खान आणि बाण यांच्यापैकी एकाला निवडण्याचे आवाहन केले होते. १९८० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबई आणि ठाण्यात घट्ट पाय रोवले होते. त्यानंतर मराठवाड्यात पाय रोवण्यासाठी औरंगाबादच्या सभेची खूप मदत झाली होती.
औरंगाबाद येथील सभेमुळे मुंबईच्या बाहेर हिंदुत्वाचे राजकारण करण्यास बाळासाहेबांना मदत मिळाली होती. आता ३४ वर्षांनंतर मनसेनेसुद्धा याच शहराची आणि याच मैदानाची निवड केली आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे सांगतात, की मनसे आपले राजकारण आणि अजेंड्यावर काम करत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या नेत्यासारखे काम करत नाही आहोत. मनसेच्या सभा मुंबईपर्यंत मर्यादित राहू नये, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकांमध्ये चर्चा झाली होती. राज्यातील इतर भागात सभा आयोजित करण्याने आम्ही दुसऱ्या शहरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहोतच, शिवाय नागरिकांपर्यंतही जाणार आहोत.
औरंगाबाद पोलिसांनी मनसेच्या सभेला काही अटींवर परवानगी दिली आहे. त्यामुळे पक्षाला दक्ष राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरात ३० ते ३५ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पराभूत केले होते. जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचेही निमंत्रण दिले होते.