मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अभूतपूर्व सत्ता आणि राजकीय नाट्यानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज खरी अग्नीपरीक्षा होती. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाबरोबरच विरोधकांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आज होता. या परीक्षेत मात्र, सत्ताधारी दणदणीत बहुमताने विजयी झाले आहेत. तर, विरोधकांची चांगलीच दाणादाण झाली आहे. सत्ताधारी सरकारच्या बाजूने तब्बल १६४ मते पडली असताना विरोधकांना मतांची शंभरीही गाठता आलेली नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी तयार झाली. या तिन्ही पक्षांचे संख्याबळ गेल्यावेळी १७० एवढे होते. बंडखोर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा खिंडार पाडले. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ५५ वरुन थेट १५ वर आले. असे असले तरी महाविकास आघाडीला १००चा आकडा का गाठता आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे बहुमत चाचणीवेळी गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच विरोधकांवर एवढी नामुष्कीची वेळ आली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार हे वेळेच विधानभवनात पोहचले नाही. मतदानासाठी अध्यक्षांच्या निर्देशानुसार सभागृहाची दारे बंद करण्यात आली. त्यामुळे चव्हाण आणि वडेट्टीवार यांना मतदानाला मुकावे लागले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाचा मोठा अनुभव आहे असे असताना ते उशीरा का आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आजच्या बहुमत चाचणीवेळी सर्वाधिक १० काँग्रेस आमदार गैरहजर राहिले. त्यात अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, झीशन सिद्दिकी, धीरज देशमुख, जितेश अंतापूरकर, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे आणि शिरीष चौधरी या आमदारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार जेलमध्ये आहे. त्यात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे. तर. त्यांचे एकूण ५ आमदार गैरहजर राहिले. त्यात अण्णा बनसोडे, संग्राम जगताप, निलेश लंके, दत्तात्रय भरणे आणि दिलीप मोहिते या आमदारांचा समावेश आहे.
भाजपचे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोन आमदार सध्या आजारी आहेत. त्यामुळे ते विधीमंडळात उपस्थित राहू शकले नाहीत. तर, समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएम चा एक आमदार तटस्थ राहिला. तर, एमआयएमचे मुफ्ती इस्माईल हे गैरहजर राहिले.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1543846331336527873?s=20&t=zyDUoecTVCo06hV5pvXdIQ
Why Opposition not achieve 100 vote against Floor Test