म्हणून साजरा होतो मातृदिन
मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे अर्थात मातृ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी व्हॉट्सऍप, सोशल मीडियावर आईचा उदोउदो केला जातो. पण, आईसाठी असा विशिष्ट दिवस साजरा करण्याचे कारण काय असेल बरे? या दिवसाची सुरुवात कधी, कशी आणि का झाली असेल, याचा विचार कधी आपण केला आहे का? आम्ही तुम्हाला याचा दिवसाचा इतिहास सांगणार आहोत.
मे महिन्यातील दुसरा रविवारच का?
मातृदिनाची परंपरा ११० वर्षांपासूनची आहे. एना जार्विस हिने या दिवसाची सुरुवात केली. आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तिने या दिवसाची सुरुवात केली. एनाच्या आईची पुण्यतिथी ९ मे रोजी असते. त्यामुळे तिने दिवस निवडताना अशाच प्रकारे निवडला की तो आईच्या पुण्यतिथीच्या आसपास असेल. विशेष म्हणजे यंदा मातृदिन ९ मे रोजीच आला आहे.
यामागची भूमिका काय?
खरं तर, आईचा त्याग, मेहनत, समर्पण यासाठी एखादा दिवस साजरा करावा, ही मूळ कल्पना एना हिची आई एन रीव्स जार्विस यांची. एक आई म्हणून महिलेचे जे काही कर्तृत्त्व असते, त्यासाठी महिलांचा सन्मान केला जावा, अशी त्यांची इच्छा होती. १९०५ मध्ये एन जार्विस यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. पण, आपल्या आईचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे एना हिने ठरवले. पण, एना हिने या दिवसाच्या मूळ संकल्पनेत बदल केला. तिचे म्हणणे होते की, या दिवशी सर्वांनी आईने आपल्यासाठी काय खस्ता खाल्ल्या आहेत, त्या आठवावे आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. लोकांना तिची ही कल्पना फारच आवडली आणि एन रीव्स यांच्या मृत्यूनंतर तीनच वर्षांत म्हणजे १९०८ मध्ये पहिला मदर्स डे साजरा करण्यात आला.
पण तुम्हाला हे माहीत आहे का
आईची इच्छा म्हणून हा दिवस साजरा करणारी एना हिनेच हा दिवस बंद व्हावा, म्हणूनही प्रयत्न केले. पहिल्या मातृदिनासाठी एना हीच पोस्टर गर्ल होती. त्या दिवशी तिने आपल्या आईची आवडती पांढरी फुले महिलांमध्ये वाटली. ही पद्धत इतकी प्रचलित झाली की, पुढच्याच वर्षीपासून या फुलांचा काळाबाजार सुरू झाला. बरेच पैसे खर्च करून ही फुले खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या संकल्पनेचा मूळ उद्देशच पूर्ण होत नसल्याचे दिसल्याने एना व्यथित झाली, आणि तिनेच हा दिवस बंद करण्याचा प्रयत्न केला.
गिफ्ट देण्याची पद्धत
मदर्स डे ला पांढऱ्या फुलांसोबतच टॉफी, चॉकलेट आणि अन्य प्रकारचे गिफ्ट देखील देण्याची पद्धत सुरू झाली. यावरूनही एना ने लोकांवर टीकाही केली. तिचे म्हणणे होते की, अशाप्रकारे या दिवसाचे बाजारीकरण होणे योग्य नाही. १९२० मध्ये तर त्यांनी लोकांनी फुले खरेदी करू नयेत, असे आवाहन केले. या सगळ्याला कंटाळून शेवटी तिने हा दिवस बंद व्हावा, म्हणून प्रयत्न सुरू केले. यासाठी तिने सह्यांची मोहीमही सुरू केली. पण यात काही तिला यश मिळाले नाही. आणि हे प्रयत्न करता करता १९४८ च्या आसपास तिचे निधन झाले.
एनाचे नातेवाईक साजरा करत नाहीत मातृदिन
हा दिवस बंद होण्यासाठी एनाने केलेल्या प्रयत्नांमुळे जगभरात तरी हा दिवस बंद झाला नाही, पण एनाचे नातेवाईक आजही हा दिवस साजरा करत नाहीत. काही वर्षांपूर्वी एनाची नातेवाईक एलिझाबेथ हिने सांगितले की, आमच्या कुटुंबात कधीही हा दिवस साजरा झाला नाही. या दिवसाचे बाजारीकरण होणे योग्य नाही, हे एनाचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटल्यानेच आजवर हा दिवस त्यांच्या कुटुंबात साजरा झालेला नाही.