मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. या दिवसापासून शरद ऋतूचे आगमन होते. ही पौर्णिमा पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंना जोडणारी आहे. त्यामुळे या पौर्णिमेला धार्मिक तसेच वैद्यकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आयुर्वेदात शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशाला अमृतासमान मानले जाते. या रात्रीचे चंद्रदर्शन नेत्रविकारांना दूर करते. तसेच चंद्रप्रकाशात ठेवलेले गरम दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे मानले जाते. याबाबत वैज्ञानिक आणि धार्मिक काय महत्त्व आहे ते जाणून घेऊयात.
वैज्ञानिक तर्क
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण गोलाकार असतो. पावसाळा ऋतूनंतर आकाशही सर्वात जास्त निरभ्र असते. या रात्री तांदूळ आणि दूधाची खीर किंवा आटवलेल्या दूधाला चांदी किंवा तांब्याच्या भांड्यात किंवा इतर धातूच्या भांड्यात कपड्याने बांधून ठेवावे. रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवून ते सकाळी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामागे वैज्ञानिक तर्क असा, की दूधात लॅक्टिक आम्ल असते. चंद्राच्या किरणांमुळे त्यात रोगनाशक शक्ती तयार होते. तांदळामधील पिष्टमय पदार्थामुळे ही प्रक्रिया आणखी वेगाने होते. ही खीर सेवन केल्यानंतर दमा, त्वचारोग आणि श्वसनाच्या आजारावर विशेष लाभ मिळतो.
धार्मिक महत्त्व
शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्राच्या पूजा केली जाते. दोघांनाही दूध आणि तांदळाची खीर विशेष प्रिय आहे. देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखविल्याने धन आणि संपन्नता वाढते असे मानले जाते. शरद पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य दाखवून तो गरिबांमध्ये वाटावा. असे केल्यास घरातून दारिद्रय दूर होते. चंद्राला खिरीचा नैवेद्या दाखवून अर्घ्य दिला तर कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो असे मानले जाते.
(टीप – या बातमीसाठी विविध माध्यमे, ज्योतिषी, पंचांग, प्रवचन, धर्मग्रंथातून माहिती संग्रहित केली आहे. याद्वारे आपल्यापर्यंत माहिती पोहोचविणे हा आमचा उद्देश आहे. वाचकांनीसुद्धा ही माहिती म्हणूनच लक्षात घ्यावे. त्याव्यतिरिक्त माहितीच्या आधारावरून केलेली कोणत्याही कृतीची जबाबदारी वाचकांची राहील.)