केळझर धरणाला गोपाळ सागर नाव का पडले
डॉ. निलीमा राजगुरु
आज गोपाळ सागर धरण परिसरात धबधबे खलाळले, ही बातमी वाचली व या पुस्तकाची आठवण झाली. पुस्तकाचे नाव: कुण्या एकाची धरणगाथा. लेखक : अभिमन्यू सूर्यवंशी. प्रकाशन -समकालीन प्रकाशन पुणे. अतिशय वाचनीय तसेच वास्तवदर्शी पुस्तक आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील केळझर धरणाची जन्म कहाणी वेगळी आहे. ही कथा आहे एका सामान्य शेतकऱ्याच्या अज्ञात झुंजीची. या तालुक्यातील चौघाने गावाच्या गोपाळ मोरे नावाच्या सामान्य शेतकऱ्याची असामान्य कथा. धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांवर खूप लिहिले गेले आहे. परंतु आपल्या भागात धरण व्हावे यासाठी एक हाती तीस-पस्तीस वर्षे लढा दिलेल्या सामान्य शेतकऱ्यावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरू झालेला हा एकाकी लढा जवळ जवळ तीन साडेतीन दशके चालला,शेवटी शेवटी तर गोपाळ रावांच्या गावातले लोक सुद्धा घरी जाऊन त्यांना समजावू लागले की आता वय झाले ही वण वण थांबवा .परंतु दुर्दम्य इच्छा शक्तीच्या जोरावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत धडका देऊन त्यांनी हे काम पूर्ण केले.
दिल्लीला जेंव्हा ते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटले तेंव्हा त्यांच्या सखोल अभ्यासपूर्ण विवेचनाने त्यासुद्धा भारावून गेल्या.त्यांनी गोपाळराव यांना आपकी पार्टी क्या हैं| असे विचारले .त्यावर नम्रपणे त्यांनी केळझर धरण बन जाये यह मेरा पक्ष है| असे सांगितले.या उत्तराने प्रभावित होऊन लगेच धरणाचे काम पंतप्रधानांनी स्वतः मार्गी लावले. हे पुस्तक वाचताना आपण खरोखर तल्लीन होऊन जातो.
शेवटी धरणाची परवानगी मिळाल्यावर गोपाळ मोरें बरोबर रडतो पण. खरोखर संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. गोपाळ मोरेंची स्मृती म्हणून तो धरण पाणीसाठा गोपाळ सागर म्हणून ओळखला जातो.
Why Kelzar Dam called as a Gopal Sagar of Baglan Taluka