अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रशिया, युक्रेनसह माजी सोव्हिएत युनियनच्या देशांमध्ये दरवर्षी वीस हजारांहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातून जातात. या देशांमधील वैद्यकीय प्रवेश अतिशय सुलभ आहे. विशेष म्हणजे भारतातल्या अभ्यासक्रमाच्या खर्चाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. त्यामुळे या देशांकडे भारतीय विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. रशिया, युक्रेननंतर चीनमध्ये जाऊन शिकण्यास विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. भारतातील खाजगी महाविद्यालयांमधील वैद्यकीय अभ्यासक्रमांची एकूण किंमत ७० लाख ते एक कोटी रुपयांदरम्यान आहे. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेतल्यास हा खर्च आणखी ३०-४० लाखांनी वाढतो. तर रशिया, युक्रेन देशांमध्ये संपूर्ण वैद्यकीय कोर्स ३० ते ५० लाखांमध्ये पूर्ण होतो, त्यामध्ये राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च समाविष्ट असतो. या देशांमध्ये प्रवेश देणाऱ्या एजन्सी देशात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. जे प्रवेश पत्रापासून व्हिसापर्यंत प्रक्रिया पूर्ण करुन देतात.
भारतात दरवर्षी सुमारे १५-१६ लाख विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेला बसतात. २०२१मध्ये, १५.४४ लाख विद्यार्थी नीट या परीक्षेला बसले होते आणि ८.७० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्णदेखील केली होती. पण देशात मेडिकलच्या जागा ८५ ते ९० हजारांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच आठ लाख यशस्वी उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होऊनही मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत. खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे रशिया, युक्रेनसारख्या देशांमध्ये जाऊन शिक्षण घेणं विद्यार्थ्यांना परवडणारे ठरत आहे. विशेष म्हणजे, तिथे कोणतीही प्रवेश परीक्षाही द्यावी लागत नाही. युक्रेनमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे १८ हजार इतकी आहे. यातील अनेक विद्यार्थी परतले आहेत आणि परतणार आहेत. पुढच्या काही महिन्यांत तिथली परिस्थिती सुधारली तरी विद्यापीठे कितपत सुरळीत होतील, हे सांगणेही कठीण आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची रशियानंतर चीनला दुसरी पसंती आहे. तेथे दहा हजारांहून अधिक वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने विद्यार्थी भारतात परतले. मात्र आता चीनने बाहेरच्या देशातून शिक्षणासाठी येणाऱ्यांना प्रवेश बंद केला आहे. तेथील शिक्षणही ऑनलाइन सुरु आहे. परंतु ऑनलाइन वैद्यकीय शिक्षण भारतात वैध नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.