नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रातील राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. सेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. शिंदे यांच्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण, सर्वांना प्रश्न हाच पडला आहे की, शिंदेसह समर्थक आमदार सर्वप्रथम सूरत येथे जमले. त्यानंतर हे सर्व जण आसाममधील थेट गुवाहाटी येथे गेले. या सर्व प्रकाराला भाजपचे समर्थन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गुवाहाटीचीच निवड का करण्यात आली. भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वा अन्य राज्यांचा पर्याय का निवडण्यात आला नाही. यासंदर्भातील एक वेगळी खेळी सध्या समोर येत आहे.
भाजप हे महाराष्ट्राबाहेर गुजरात येथेच सर्व राजकीय नियोजन करणार होते. त्यानंतर महाराष्ट्रात येऊन सत्ता हस्तगत करण्याचा भाजप आणि शिवसेनेतील बंडखोर नेत्यांसह आमदारांचा डाव होता. मात्र त्यामध्ये अचानक बदल करावा लागला. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील कार्यकर्ते व जनतेमध्ये निर्माण झालेली भावना तसेच त्याचा परिणाम गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर होऊ नये. यासाठी गुजरातमधून सर्व आमदारांना तातडीने आसाम मधील गुवाहाटी येथे हलविण्यात आले.
महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पुरस्कृत सरकार स्थापण्याच्या खेळीसाठी भाजपने खरे तर गुजरातची निवड केली होती. गुजरातमधूनच महाराष्ट्रातील नव्या सरकारची मुहूर्तमेढ करण्याचा डाव होता. मात्र ऐनवेळी बदललेल्या राजकीय घटनांमुळे विरोधकांकडून नवी खेळी खेळली जाण्याची शक्यता ल७ात घेत आणि सर्व प्रकारची खबरदारी घेत गुवाहाटीचा पर्याय निवडण्यात आला.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या मतमोजणीत सर्वच राजकीय पक्ष दंग असताना शिंदे हे आपल्या समर्थकांसह गुजरातच्या दिशेने रवाना झाले. या आमदारांच्या सोयीसुविधेसाठी गुजरातमधील भाजपचे नेते तसेच पोलीस प्रशासन यापूर्वीच सक्रिय झाले होते. गुजरातमध्ये प्रवेश करताच बलसाड येथे या आमदारांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या सर्व आमदार व मंत्र्यांनी सुरत येथील हॉटेल गाठले आणि तेथेच मुक्काम ठोकला.
या हॉटेलमध्ये सर्व डावपेच ठरले आणि त्यानंतर गुजरातमधील भाजपचे नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. सूरत येथून या सर्व आमदारांना गुजरातमधील आनंद, अहमदाबाद किंवा गांधीनगर या तीन ठिकाणी हलविण्याचे नियोजन होते. त्यासाठी आनंद व अहमदाबाद येथे हॉटेल आणि रिसोर्टचे बुकिंगही करण्यात आले होते. याचठिकाणी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांना आणण्यात येणार होते. तेथेच सर्व जुळवाजुळव करून त्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याचा अखेरचा डाव टाकण्यात येणार होता.
सूरतच्या हॉटेलमध्ये एका आमदाराची तब्येत बिघडली तर एका आमदाराने महाराष्ट्राचा रस्ता धरला. तसेच, आमदाराच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिल्याने महाराष्ट्र पोलिस सूरतमध्ये येण्याचीही चिन्हे होती. या सर्व बाबीचा विचार करण्यात आला. येत्या काही महिन्यातच होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर राजकीय परिणाम होऊ नये, शिवाय महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे खापर भाजपच्या सत्ता असलेल्या गुजरातवर येऊ नये, यासाठी आमदारांना गुवाहाटीत हलविण्यात आले. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या जवळ आहे. त्यामुळे थेट ईशान्येतील आसामची निवड करण्यात आली. आता तेथे सर्व आमदार सुरक्षित राहू शकतात. तसेच, आमदारांचे पलायनही होऊ शकणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
why guwahati city chosen for rebel sena mla Maharashtra political crisis