मुंबई – प्रत्येक खेळाचे आणि प्रत्येक स्पर्धेचे एक वैशिष्ट्य असते. ऑलिम्पिकचीही काही वैशिष्ट्ये आहेत. सध्या जपानमधील टोकियो शहरात ऑलिम्पिकचा महाकुंभ सुरू असून कोरोनाच्या दहशतीतून सावरत असलेल्या जगाला काही दिलासा देणारा हा काळ मानला जात आहे. अशात ऑलिम्पिकमध्ये पदक पटकाविल्यानंतर खेळाडू हे पदक दाताने का चावतात, असा प्रश्न अनेकांना पडत असेल. याबाबत लोक आपापले तर्क लावतात, पण आज सत्य जाणून घेऊया…
खेळाडू खरोखर दाताने पदक चावत नाहीत तर दातांच्या मध्ये ठेवून केवळ चावत असल्याचे नाटक करतात. असे म्हटले जाते की, अनेक वर्षांपूर्वी छायाचित्रकारांच्या डिमांडवर हा प्रकार सुरू झाला. तेव्हापासून गळ्यात लटकलेले पदक दाताने चावतानाची पोझ खेळाडू देताना दिसतात. यात खेळाडूचा चेहरा आणि पदक या दोन्ही गोष्टी एका छोट्याश्या फ्रेममध्ये येतात आणि हा क्लोजअप शॉटही दमदार होतो.
तरीही दाताने पदक चावण्यामागेही लोक वेगवेगळे तर्क लावत असतात. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑलिम्पिक हिस्टोरियसचे अध्यक्ष डेव्हिड वालेचिंस्की यांनी सांगितले की, ‘काही वर्षांपूर्वी यावर चर्चा झाली होती. त्यानंतर यामागे काहीच शास्त्र नसून केवळ छायाचित्रकारांच्या आग्रहाखातर असे करतात. अन्यथा कोणताच खेळाडू आपल्या सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदकाला अशा पद्धतीने खराब करण्याचा विचार करणार नाही.’
सोने शुद्ध आहे का?
अशीही एक मान्यता आहे की, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी खेळाडू हे पदक चावून बघतात. चावल्यानंतर त्यात डाग पडले तर सोने शुद्ध नाही, असे सिद्ध होते. मात्र हा तर्कदेखील तथ्यहिन आहे, कारण पदकावर सोन्याचे केवळ आवरण असते. हे पदक पूर्णपणे सोन्याचे नसतेच.