नवी दिल्ली – असा एक काळ होता, जेव्हा लस उत्पादकांचे आयुष्य खूप कठीण होते. लशीच्या परवानगीसाठी नोकरशाही आणि औषध महानियंत्रकाचे पाया पडावे लागत होते. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, असे मत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि अदार पुनावाला यांचे वडील डॉ. सायरस पुनावाला यांनी व्यक्त केले. सायरस पुनावाला यांना नुकताच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे.
अधिकार्यांची खुशमस्करी करावी लागत असल्याची खंत व्यक्त करताना पुनावाला यांनी व्यवस्थेवर टीका केली. परंतु कोविशिल्ड लस बनविताना औषध नियंत्रकाची खुशमस्करी करावी लागली नाही. त्यामुळेच ती त्वरित उपलब्ध होऊ शकली. औषध नियंत्रण अधिकारी कार्यालयीन वेळेनंतरही उत्तर देत होते. त्यामुळे कोणाचे तोंड पाहण्याची वेळ आली नाही, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वार्षिक उत्पादनानुसार, जगातील सर्वात मोठी लस निर्माती कंपनी आहे. देशातच नव्हे, तर जगभरात सर्वाधिक औषध उपलब्ध करून देण्यासाठी सीरमचा पुढाकार आहे.
फोर्ब्सच्या २०२० च्या यादीनुसार, सायरस पुनावाला हे सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या सहाव्या स्थानावर होते. २०२१ च्या फोर्ब्सच्या करोडपतींच्या यादीतही पुनावाला यांचा समावेश आहे. सायरस पुनावाला यांनी १९६६ रोजी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली होती. त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, लस उत्पादनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे वेगळे स्थान होते. त्यादरम्यान अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. पाणी, वीज अशा पायाभूत सुविधांसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घेता घेता नाकीनऊ येत होते. हे बोलणे योग्य ठरणार नाही पण वाहतूक आणि संवादासारख्या सुविधा मिळविण्यासाठी मोठे आव्हान होते. माझ्या कर्मचारी आणि संचालकांना अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
टिळक पुरस्कार त्यांनी पत्नी विल्लू यांना समर्पित केला आहे. हा खूपच दुखदायक प्रवास होता. परंतु आता त्याचे चांगले फळ मिळत आहे. मोदी सरकारने लाल फितशाहीला लगाम लावली आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. आतापर्यंत मला ब्रिटेन आणि अमेरिकेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी खूपच विशेष आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.