विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूमध्ये पुन्हा पुन्हा म्युटेशन होत असल्याने गंभीर व्हेरिएंट संपूर्ण जगभरात फैलावत आहे. म्युटेशनची ओळख पटविण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगची गरज आहे. परंतु भारतात सिक्वेन्सिंग करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. जगभरातील देशांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत तेथील जिनोम सिक्वेन्सिंगचे प्रमाण चांगले आहे. भारतात आतापर्यंत ४५ हजार नमुन्यांची सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे.
तज्ज्ञांकडून भारतात जिनोम सिक्वेन्सिंग वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु डेन्मार्क आणि कॅनडामध्ये १२, नेदरलँडच्या तुलनेत १० टक्क्यांहून अधिक प्रयोगशाळा असूनही भारतात जिनोम सिक्वेन्सिंग पुरेशा प्रमाणात होत नाहीये. एका नमुन्याची सिक्वेन्सिंगसाठी सरासरी ६३ दिवस लागतात. भारतात २८ प्रयोगशाळेत सिक्वेन्सिंग सुरू आहे. तर डेन्मार्क आणि कॅनडामध्ये २५-२५ आणि नेदरलँडमध्ये २६ प्रयोगशाळेत चाचण्या सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर जीआयएसआयडीनुसार, भारतातून आतापर्यंत २८ हजार सिक्वेन्सिंगची माहिती देण्यात आली आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये भारत १३ व्या स्थानावर आहे. देशात रुग्णांची संख्या ३०,०८२,७७८ पर्यंत पोहोचली आहे. तर ३,९१,९८१ जणांचा मृत्यू झालेला आहे.
जगात सर्वाधिक अमेरिकेत ३३,२४३,५२९ रुग्ण आढळले असून, ५,९७,३७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही अमेरिकेत आतापर्यंत ५,६९,२५२ (१.७१ टक्के) नमुन्यांची सिक्वेन्सिंग पूर्ण झाली आहे. परंतु भारतात २८,३४२ (०.०९३९ टक्के) नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण झाली आहे.