नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – भाजप नेतृत्वाला सातत्याने लक्ष्य करणारे मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. तरीही भाजप नेतृत्व त्यांच्यावर कारवाई करत नाहीये. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीपूर्वी भाजप कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. सत्यपाल मलिकांच्या आरोपांना भाजपकडून का प्रत्युत्तर येत नाही, याचे कारण जाणून घेऊया.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या सारखे वादग्रस्त वक्तव्य करत असतानाही भाजप सध्या शांत आहे. पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांच्यावर नाराज असून, त्यांच्यावर कारवाई होण्याच्या बाजूने आहेत. तरीही यूपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते शांत आहेत.
जाट समाजाचे प्रतिनिधित्व
सत्यपाल मलिक जाट समाजातून येतात. पश्चिम उत्तर प्रदेशातून ते येतात. तीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकर्यांनी नुकतेच केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन केले होते. त्यावर मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते. यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन संपविणे हा सरकारच्या रणनीतीचा भाग होता. त्याशिवाय सत्यपाल मलिक यांच्यावर कारवाई करून सरकारला जाट समाजाला नाराज करायचे नव्हते.
रणनीती
सूत्रांच्या माहितीनुसार, मलिक यांना हटवून कोणताही हेतू पूर्ण होणार नाही. राज्यपालपदावरील मलिक यांचा काही महिन्यांचा कार्यकाल बाकी आहे. त्यांच्यावर टीका करून उपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच हिताचे ठरेल असे एका भाजप नेत्याचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेतृत्वावर टीकास्त्र सोडणारे पिलभीत येथील भाजपचे खासदार वरुण गांधी यांच्याबद्दलही भाजपने हीच रणनीती अवलंबली आहे.