विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
प्रचंड बहुमताने तिसर्यांदा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या या जादुई करिश्म्याच्या कारणांचा शेध घेतला तर अनेक कारणे समोर येतात. परंतु २०१४ नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले तर एक मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. तो म्हणजे अस्मितेचा मुद्दा. हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीला निस्तेज करत आहे. २०१५ मध्ये बिहार आणि मागील विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये याच अस्मितेच्या मुद्द्यावर भाजप पराभूत झाला होता. अस्मितेच्या मुद्द्यावरच गुजरातमध्ये मोदी यांना मागील निवडणुकीत विजय मिळाला होता.
गेल्या सात वर्षांमध्ये जितक्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपचा अधिक ठिकाणी विजय झाला. ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला, तिथे अस्मितेचा मुद्दा होता. या मुद्द्याच्याच आधारावर प्रादेशिक पक्षांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे. बंगालमधील संपूर्ण निवडणुकीवर नजर टाकल्यास एक गोष्ट महत्त्वाची निदर्शनास आली.
तृणमूल काँग्रेसने बंगाली अस्मितेवरून पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपच्या इतर नेत्यांना घेरले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका प्रचारसभेत कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मस्थानाचे चुकीचे नाव घेतले होते. या मुद्द्याला तृणमूल काँग्रेसने लगेच पकडले. ज्या लोकांना कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मस्थाळाबाबत ज्या लोकांना माहिती नाही, असे लोक सोनार बांगला बनविण्याच्या गोष्टी करत आहेत, ही बाब तृणमूलच्या नेत्यांनी संपूर्ण प्रचारात सांगितली.
संपूर्ण प्रचारात ममता बॅनर्जींसह तृणमूलचे सर्व नेते हीच गोष्ट सांगत आले की, मोदी आणि शहा दोघेही गुजराती आहेत आणि गुजराती लोकांना बंगालमध्ये कधीच राज्य करू देणार नाही. भाजपने सुवेंदू अधिकारी, मुकूल रॉय, मिथून चक्रवर्तींसह काही नेत्यांना पुढे करून अस्मितेच्या मुद्दयाला दाबण्याचा प्रयत्न भाजपने केला. परंतु जनतेने त्याला स्वीकारले नाही.
२०१४ नंतर भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समोर करून विधानसभा निवडणुका लढवत आहे. त्यात त्यांना काही ठिकाणी विजयही मिळाला. परंतु ज्या नेत्यांनी मोदी-शहा यांच्यासमोर अस्मितेचा मुद्दा ठेवला तिथे भाजपचा पराभव झाला आहे.
प्रशांत किशोर यांचे अस्त्र
बिहारमध्ये २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी नितीश कुमार यांच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी नितीश कुमार यांचे निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन सांभाळणार्या प्रशांत किशोर यांनी उत्तरादाखल संपूर्ण बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचा (जेडीयू) प्रचार करून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की, गुजरातमधून आलेले लोक बिहारी डीएनएवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला परंतु अखेर भाजपला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.