मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीने नुकतेच त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलले आहेत. बिप्लब कुमार देव यांच्या जागी राज्याची सूत्रे मणिक साहा यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. बिप्लब कुमार देव यांना बदलण्यामागे आता वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. परंतु गेल्या सहा वर्षांची राजकीय परिस्थिती एका वेगळ्या फॉर्म्युल्याचे संकेत देत आहे. आकडेवारीनुसार या सहा वर्षांत भाजपने ज्या राज्यात मुख्यमंत्री बदलले आहेत, तिथे त्यांना निवडणुकीत यश मिळाले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार गेल्या सहा वर्षांमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी ४ राज्यांमधील ६ मुख्यमंत्री बदलले. त्यापैकी गुजरात आणि उत्तराखंडमध्ये भाजपचा विजय झाला. दोन राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. तर याउलट गेल्या ५ राज्यांमध्ये भाजपने ज्या सहा राज्यात मुख्यमंत्री बदलले नाहीत, तिथे भाजप बहुमत मिळविण्यास अपयशी ठरला.
राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमध्ये भाजपने मुख्यमंत्री बदलले नाहीत. विशेष म्हणजे या सर्व राज्यांमध्ये पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. २०१७ मध्ये भाजपने राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन काँग्रेस सत्तेवर आली होती.
छत्तीसगढमध्ये २०१७ च्या निवडणुकीच्यादरम्यान रमण सिंह मुख्यमंत्री होते. तिथेसुद्धा भाजपचा पराभव होऊन काँग्रेस सत्तेत आली होती. २०१९ मध्ये झारखंडमधील निवडणुकीच्या दरम्यान रघुबर दास मुख्यमंत्री होते. तिथे झारखंड मुक्ती मोर्चाने मुसंडी मारत भाजपला पिछाडीवर टाकले होते. झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेससोबत युती करून सरकार स्थापन केले होते.
मध्य प्रदेशमध्ये २०१७ च्या निवडणुकीत शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री होते. त्यादरम्यान काँग्रेसने निवडणुकीत विजय मिळविला होता. कमलनाथ यांनी बहुजन समाज पार्टी आणि अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. तथापि, ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचे सरकार कोसळले आणि भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून भाजपने निवडणूक लढविली. परंतु निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.
हरियाणामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनोहर लाल खट्टर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु त्यांना बहुमत मिळू शकले नाही. निवडणुकीनंतर तथापि, निवडणुकीनंतर भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीसोबत युती करून सरकार स्थापन केले.
गुजरामध्ये भाजपने २०१७ विधानसभा निवडणुकीपूर्वी आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. त्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीत विजय मिळविला. भाजपने नंतर विजय रुपाणी यांना हटवून भूपेंद्र पटेल यांना संधी दिली. या वर्षाअखेर गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपने गेल्या वर्षी दोनदा मुख्यमंत्री बदलले. आधी २०२१ मध्ये तिरथ सिंह रावत यांच्या जागी त्रिवेंद्र सिंह रावत यांना संधी देण्यात आली. नंतर जुलै २०२१ मध्ये त्यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांना संधी देण्यात आली. विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पक्षाने जुलै २०२१ मध्ये बी. एस. येडियुरप्पा यांना हटवून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनविले होते.