मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात महाविकास आघाडी सरकार पायऊतार झाल्याने नवे सरकार स्थापन होणार आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या २ ते ३ दिवसातच नवे सरकार स्थापन होणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र, नव्या सरकारमधील विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी कुणावर असेल याची आता चर्चा सुरू झाली आहे.
भाजपकडून चांगलेच शिवसेनेला खिंडीत गाठले जात होते. शिवसेना पक्ष प्रमुख आणि तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रोषाचा सामना करावा लागत होता. आता फडणवीस हे मुख्यमंत्री हणार आहेत. मात्र, उद्धव यांनी मुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे उद्धव हे विधीमंडळात नसतील. त्यातच शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ५५ वरुन थेट १४वर आले आहे. परिणामी, विरोधी पक्ष नेते पद हे सेनेला मिळणार नाही.
काँग्रेसचे संख्याबळही अत्यल्प आहे. त्यामुळे हे पद आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणारे अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी असणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदानंतरही अजित पवार यांचा दबदबा कायम राहणार आहे. फडणवीस आणि शिंदे गट सरकारला धारेवर धरण्याचे काम पवार यांना करावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता ते हे काम चोखपणे पार पाडतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Who will opposition leader in new government Maharashtra Political Crisis