मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आपल्या उद्योग समुहात नेतृत्वबदल करण्याचे सूतोवाच केले आहे. वरिष्ठ सहकार्यांना सोबत घेऊन युवा पिढीकडे नेतृत्व सोपविण्याच्या प्रक्रियेत गती आणण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य त्यांनी मंगळवारी केले. मुकेश अंबानी यांनी प्रथमच त्यांच्या कंपनी समुहाच्या उत्तराधिकार्यासंदर्भात वक्तव्य केले आहे.
रिलायन्स समुहची कमान मुकेश अंबानी यांनी वडील धिरूभाई अंबनी यांच्याकडून स्वीकारली होती. आता ते ६४ वर्षांचे झाले आहेत. मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली. अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा आगामी वर्षांमध्ये जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि बळकट कंपन्यांच्या यादीत समावेश होईल. कंपनीच्या स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्र, किरकोळ आणि दूरसंचार क्षेत्रातील उद्योगांची भूमिका महत्त्वाची असेल. मुकेश अंबानी यांना आकाश आणि अनंत हे दोन मुलगे असून, ईशा ही मुलगी आहे.
मुकेश अंबानी म्हणाले, की मोठी स्वप्ने आणि अशक्य दिसणार्या लक्ष्यांचा पाठलाग करण्यासाठी योग्य व्यक्तींना जोडणे आणि योग्य नेतृत्व असणे आवश्यक आहे. रिलायन्स आता एका महत्त्वाच्या नेतृत्वबदलावर अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेत आहे. हा बदल माझ्या पिढीच्या वरिष्ठांपासून नव्या पिढीमध्ये होणार आहे. या प्रक्रियेला गती देण्याची इच्छा आहे.
अंबानी सांगतात, माझ्यासह सर्व वरिष्ठांना आता रिलायन्समध्ये सक्षम, कटिबद्ध आणि हुशार युवा नेतृत्व विकसित करण्याची गरज आहे. आम्ही त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. त्यांना सक्षम बनवून प्रोत्साहित करण्याची गरज आहे. ते आमच्यापेक्षा चांगली कामगिरी करत असतील, तर शांतपणे बसून आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. दरम्यान, अंबानी यांनी वक्तव्य केल्यानंतर याबद्दल रिलायन्सकडून अद्याप तपशील आलेला नाही.