मनिष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहलीच्या पायउतार होण्याच्या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. २०१४ मध्ये कसोटी संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीची निवड करण्यात आली होती. त्यादरम्यान महेंद्र सिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू असताना मध्येच कर्णधारपद सोडले होते.
भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर विराट कोहलीने ही घोषणा केली आहे. परंतु आता भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी तीन मोठी नावे समोर आली आहेत. कोण आहेत ते खेळाडू जाणून घेऊया.
दुखापग्रस्त रोहित शर्माला नुकतेच टी-२० आणि एकदिवसीय फॉर्मेटचा कर्णधार नियुक्त केले होते. त्यामुळे विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्याने रोहित शर्मा नवा कसोटी कर्णधार बनण्याच्या दावेदारीत पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु रोहितने अद्याप भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केलेले नाही. परंतु बीसीसीआयकडून त्याच्यावर विश्वास टाकण्याची शक्यता जास्त आहे.
रोहित शर्मानंतर के. एल. राहुलसुद्धा कसोटी संघाचे नेतृत्व करण्याचा दावेदार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत एका सामन्यात राहुलने भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. के.एल. राहुलने प्रथमच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद सांभाळले होते. परंतु भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याशिवाय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद राहुलने भूषवले आहे.
मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा तिसरा मोठा दावेदार आहे. जसप्रीत बुमराहला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले होते. बुमराहला ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स यांच्याप्रमाणे कर्णधार बनवले जाऊ शकते.