विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा वेगाने फैलाव होत असल्याने तसेच तो जीवघेणा ठरत असल्यामुळे भारतात रुग्णांचा स्फोट झाला आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी केवळ लसीकरण हाच उपाय असून, अभियान वेगाने होण्याची गरज आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.
एएफपी वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या, भारतात नव्या स्ट्रेनचा खूपच वेगाने फैलाव होत असल्याने मोठा विध्वंस होत आहे. भारतात ऑक्टोबरमध्ये B.१.६१७ हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला होता. हा स्ट्रेन सध्या लाखो लोकांना बाधित करत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन B.१.६१७ वेगाने म्यूटेंट होत असल्याने लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आपल्या वास्तविक रूपापेक्षा अधिक पटीत घातक असून तो वेगाने फैलावत आहे. अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश या स्ट्रेनला गंभीरतेने घेत आहेत. डब्ल्यूएचओसुद्धा यावर लवकरच संशोधन करेल अशी आशा आहे.
कोरोनाचा नवा स्ट्रेन इतका धोकादायक आहे की तो शरीरारत अँटीबॉडी तयार करण्यासही बाधा आणतो. परंतु भारतातील सर्वाधिक रुग्णसंख्येला आणि मृत्यूंना पूर्णपणे नव्या स्ट्रेनला दोष देता येणार नाही. लोकांचा निष्काळजीपणासुद्धा जबाबदार आहे. शारिरीक अंतर राखण्याचे नियम असो अथवा मास्क लावणे असो सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांकडून आयोजित केलेल्या मोठमोठ्या प्रचारसभासुद्धा याला जबाबदार आहेत. या प्रचारसभांमध्ये लाखोंच्या संख्येने गर्दी जमा झाली होती. ज्यामुळे कोरोनाला वेगाने फैलाव होण्यास मदतच झाली, असेही त्यांनी सांगितले.
पुरेशा लोकांचे लसीकरण होईपर्यंत आपल्याला कोरोना विषाणूचा सामना पाय रोवून करावा लागणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या लशीच्या दोन डोसदरम्यान ८-१२ आठवड्याच्या वेळेला वाढविले जाऊ शकते. लहान मुलांना लस देण्यास त्या अनुकूल नाहीत. दुसरी लाट रोखण्यासाठी लोकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.