विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, तोच पुन्हा आता डेल्टा व्हेरिएंट (अवतार) मुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा तब्बल ८५ देशात शिरकाव झाला आहे. ही बाब यापूर्वीच्या विषाणू पेक्षा अधिक गंभीर असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे की, कोरोनाचा डेल्टा प्रकार त्याच्या जुन्या स्वरूपापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. त्याचप्रमाणे, जर हा विषाणूचा हा प्रकार वाढत गेला तर तो जगभर संक्रमण पसरविण्यास मोठा घटक ठरू शकतो.
डब्ल्यूएचओने कोरोना महामारीचा जागतिक स्थिती अहवाल जाहीर करताना सांगितले की, डब्ल्यूएचओ व्हायरसचा अल्फा प्रकार जगातील १७० देशांमध्ये, बीटा ११९, गॅमा ७१ आणि डेल्टा ८५ देशांमध्ये पसरला आहे. डेल्टा विषाणूच्या प्रसाराचे कार्य वेगाने सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यांभरात हा विषाणू ११ देशांपर्यंत पोहोचला आहे यावरून याचा अंदाज केला जाऊ शकतो. या चार प्रकारांचे बारकाईने निरीक्षण केले जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे. यात अल्फापेक्षा वेगवान डेल्टा असल्याचे दिसत आहे.
आता काही देशांची कोरोना बाबतची सद्यस्थिती जाणून घेऊ या…
भारत
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, १४ ते २० जून दरम्यान, भारतात कोरोना संसर्गाची सर्वाधिक संख्या ४,४१,९७६ झाली आहे. मागील आठवड्यापेक्षा ही ३० टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे या काळात भारतात सर्वाधिक १६,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला असून यापूर्वीच्या तुलनेतही ३१ टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार भारतात दुसरी लाट मंदावली आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटचा धोका भारतात वाढू लागला आहे.
सिंगापूर
डब्ल्यूएचओने सिंगापूरमध्ये केलेल्या अभ्यासाचा हवाला देऊन म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंटमुळे ग्रस्त लोकांना अधिक ऑक्सिजन आणि आयसीयूची आवश्यकता असू शकते. मृत्यूचा धोकाही जास्त असून तो चिंतेचा विषय आहे. लस संदर्भात, संस्थेने म्हटले आहे की फायझर आणि अॅस्ट्रॅजेनेका लसांच्या दुसऱ्या डोसच्या १४ दिवसानंतर अल्फा आणि डेल्टा प्रकारांविरुद्ध ते ९६ टक्के प्रभावी आहे.
इस्त्राईल
इस्त्राईलने दावा केला आहे की, फायझरची लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध प्रभावी आहे. इस्रायल मधील फिझरचे वैद्यकीय संचालक लन रॅपपोर्ट यांनी सांगितले की, प्रयोगशाळेच्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की फायझरची लस डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रभावी आहे, परंतु त्यास विस्तृत करण्यास नकार दिला. इस्त्राईलमध्ये फायझर लस मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.
जर्मनी
जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांनी संसदेत डेल्टा प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. मर्केल यांनी सांगितले की, संसर्ग कमी होण्याच्या दरम्यान डेल्टा प्रकाराचा प्रादुर्भाव वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. युरोपीय देशांच्या नेत्यांमध्ये चर्चेसाठी कोरोना हा मुख्य मुद्दा राहिला पाहिजे. साथीचे रोग संपलेले नाहीत, विशेषत: गरीब देशांमध्ये काळजी घ्यायला हवी. आम्ही स्वतः आमच्या देशात काळजी घेत आहोत.
रशिया
रशियामध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची गती वाढली आहे. यंदा प्रथमच येथे गुरुवारी २०,१८२ प्रकरणे नोंदली गेली. यासाठी अधिकाऱ्यांनी डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग आणि लसीकरण न केलेल्या लोकांना जबाबदार धरले आहे. गेल्या २४ तासांत ५६८ लोकांचा मृत्यू झाला आहे. मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. वाढती संसर्ग प्रकरणे पाहून लोकांनी सरकारला प्रत्येकास लस देण्याचे आवाहन केले आहे.