अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मध्यम उत्पन्न गटातील लोक जास्त सोने खरेदी करतात आणि सोने भौतिक स्वरूपात ठेवण्यास प्राधान्य देतात. इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटर (IPC) च्या गोल्ड अँड गोल्ड मार्केट-२०२२ अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. उच्च उत्पन्न गटातल्या लोकांचाही सोने खरेदीला प्राधान्य असून ते डिजिटल किंवा पेपर फॉरमॅटमध्ये (कागदी दस्तऐवजांच्या स्वरूपात) सोने गुंतवूण ठेवण्यास प्राधान्य देतात.
श्रीमंतांमध्ये सोन्याचा वापर सर्वाधिक आहे, परंतु सोने खरेदीस प्राधान्य मात्र मध्यमवर्गीयांमध्ये जास्त दिसून येतं. २ ते १० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाच्या श्रेणीतील कुटूंबांमध्ये सर्वाधिक सोने खरेदी केले जाते. सुरक्षित गुंतवणुकीच्या बाजूने विचार करुन सोने खरेदी प्राधान्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. आर्थिक गुंतवणूकीसाठी मध्यमवर्गीय माणसं सोने आणि सोन्याच्या वस्तू, दागिन्यांबरोबरच बँक मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा, पोस्ट ऑफिस बचत, यांचादेखील विचार करताना दिसतात. १० लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या उच्च – मध्यम आणि श्रीमंत वर्गासाठी, बचतीचे वेगवेगळे मार्ग शोधले जात असतात. त्यामध्ये सर्वाधिक पसंती स्टॉक किंवा शेअर्स, डेरिव्हेटिव्ह्ज आणि रिअल इस्टेटला देत आहेत.
भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेवर पीपल रिसर्च (PRICE) च्या सहकार्याने IGPC ने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे घरगुती सोन्याचा वापर अहवाल तयार करण्यात आला. ४० हजार घरांचे सर्वेक्षण यात करण्यात आले. नोटबंदी किंवा जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) लागू केल्याने सोन्याच्या वापरावर परिणाम झाला नसल्याचे अहवालात पुढे आले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षांत किमान ७४ टक्के उच्च उत्पन्न असलेल्या कुटूंबांनी सोने खरेदी केली आहे. या अहवालात असेही आढळून आले की सोने हे उत्सवाचे प्रतिक आहे आणि लग्न आणि सणांमध्ये दागिन्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असते. सुमारे ४३ टक्के भारतीय कुटुंबे लग्नासाठी सोने खरेदी करतात. त्यामुळे सोने हे श्रीमंतांसाठी आहे हा समज चुकीचा आहे असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ३१ टक्के लोक कोणत्याही विशेष प्रसंगाशिवाय सोने खरेदी करतात. आयजीपीसीचे अध्यक्ष अरविंद सहाय म्हणाले, “सोने श्रीमंतांसाठी असते या सर्वसाधारण मानसिकतेच्या विरुद्ध, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे. मध्यम-उत्पन्न कुटुंबे मूल्य आणि प्रमाणानुसार सर्वाधिक सोने खरेदी करतात. “