मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने संघर्ष सुरु आहे. या गटांच्या सुरु असणाऱ्या न्यायालयीन लढाईमध्ये पहिला निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. आता खरी शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा व त्याबाबत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये मोकळा करुन आहे. यानंतर शिंदे गटाने आता दसरा मेळाव्याची तयारी सुरु केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा वांद्रे – कुर्ला संकुल येथे होणार आहे. हा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार शिंदे गटाने केला असून यानिमित्त शिंदेंच्या निवासस्थानी शिंदे गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठकदेखील नुकतीच घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाबद्दल मोठे विधान केले आहे. “आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी जाणीवपूर्वक पक्षप्रमुख पद मोकळे ठेवले की काय हे तेच सांगू शकतील. पण सध्या शिंदेसाहेबांनी पक्षप्रमुख पदावर कोणाचीही निवड केलेली नाही.” असं केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दसरा मेळावा हा बाळासाहेबांच्या विचारांचे सोन लुटणारा दिवस असल्याचं नमूद करत केसरकर यांनी महाराष्ट्रात लोकशाही अवतरल्याचं म्हटलं. तसेच मुख्यमंत्री शिंदे हेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं आकर्षण असणार आहेत असेही केसरकरांनी सांगितले.
निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणाची यावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये उत्साह असून त्यांच्या या न्यायालयीन लढाई जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यास शिवसेनेस परवानगी मिळाल्याने शिंदे गट काहीसा अस्वस्थ होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गट जोमाने दसरा मेळाव्याच्या कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.
Who is Party Chief of Shinde Group Deepak Kesarkar Says
Politics Shivsena Rebel