मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सरस्वतीची प्रतिमा शाळेत लावण्यावरून भुजबळांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता मुंबईतील एक व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते ललित टेकचंदाणी यांनी भुजबळांविरोधात तक्रार दिली आहे. भुजबळांनी धमकी दिल्याचा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी भुजबळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारला जात आहे की, ललित टेकचंदाणी ही व्यक्ती आहे तरी कोण. ती काय करते आणि भुजबळांनी त्यांना धमकी का दिली. याविषयी आता जाणून घेऊया…
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत टेकचंदाणी यांनी म्हटले आहे की, माझ्या जीवाला धोका असून मला जीवे मारण्याचे धमकी देणारे फोन येत आहेत. यामागे माजी मंत्री व आमदार छगन भुजबळ यांचा हात आहे. तर, छगन भुजबळ यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. भुजबळ म्हणाले की, टेकचंदाणी याने यापूर्वी देखील आमच्या नावावर अनेक खोट्या केसेस केल्या आहेत. त्याला आम्ही तोंड देत आहोत. गेल्या दहा वर्षांपासून टेकचंदाणी आणि माझ्यात वैर असून नाव बदनाम करण्यासाठी हे सर्व नाटक रचल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. शिवाय टेकचंदानी यांचा नंबरही मी मोबाईलमधून डिलिट केला आहे. त्यामुळे आमचा संपर्कच नाही. त्यामुळे टेकचंदाणी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मात्र सध्या मला छगन लाल, चिक्की खाय – बिक्की खाय असे मेसेज येत असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना गैरकारभार केल्याच्या तक्रारी टेकचंदाणी यांनी पोलिसांत केल्या होत्या. त्यावरून गुन्हे दाखल झाले होते. ललित टेकचंदाणी हे मुंबईतील व्यापार आणि बांधकाम क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. त्यांच्यावरही विविध गुन्हे दाखल आहेत. टेकचंदाणी हे कधीकाळी भुजबळ यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. भुजबळ बांधकाम मंत्री असताना टेकचंदाणी यांच्या शिवाय भुजबळ कोणतेही आर्थिक निर्णय घेत नसल्याचे सांगण्यात येते.
सुमारे दहा वर्षे भुजबळ आणि टेकचंदाणी यांच्यात अत्यंत चांगला संपर्क होता. कालातरांने टेकचंदाणी आणि भुजबळ यांच्यात खटके उडाले. दरम्यान सार्वजनिक खात्याचे भुजबळ मंत्री असतांना ललित टेकचंदाणी यांच्यासह पाच जणांवर दिल्ली येथील अभिषेक मांगलिक यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याआधी ललित टेकचंदाणी हे गोपीनाथ मुंडे यांच्याशी संबंधित काम करत असल्याचे कळते. तसेच टेकचंदाणी यांची मुंबईत चेंबुर भागात हेक्स कॉर्पोरेशन या नावाने भव्य इमारत आहे.
Who is Lalitkumar Tekchandani of Mumbai
Chhagan Bhujbal