मुंबई – क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरूख खान याने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांना आर्यनचे वकीलपत्र दिले आहे. सतीश मानशिंदे यांनी रिया चक्रवर्ती, सलमान खान आणि संजय दत्त यांचेही वकीलपत्र घेतले होते. ते बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी वकील मानले जातात. ते नक्की कोण आहेत त्याचीच माहिती आपण आज करुन घेणार आहोत….
५६ वर्षीय वकील सतीश मानशिंदे हायप्रोफाइल प्रकरणांमध्ये नेहमीच आघाडीवर असतात. मानशिंदे यांनी यापूर्वी अनेक बॉलिवूड स्टार्स आणि त्यांच्या कुटुंबियांचे वकीलपत्र घेतले आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तला सतीश मानशिंदे यांनी जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर त्यांना हायप्रोफाइल प्रकरणांमधील वकील म्हणून प्रसिद्धी मिळाली.
२००२ साली ड्रंक अँड ड्राइव्हिंग प्रकरणी सलमान खान यालाही मानशिंदे यांनी जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर सलमान खानला न्यायालयाने मुक्त केले होते. सध्या ते अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोइकचे प्रकरण न्यायालयात लढत आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात रिया आणि शोइकला एनसीबीने अटक केली होती. न्यायालयाने दोघांनाही जामीन दिला होता. पालघर लिंचिंग प्रकरणात मानशिंदे हे फिर्यादींचे विशेष वकील आहेत.
१९८३ मध्ये प्रसिद्ध वकील दिवंगत राम जेठमलानी यांच्या नेतृत्वाखाली मानशिंदे यांनी वकील म्हणून काम सुरू केले होते. जवळपास दहा वर्षे त्यांनी जेठमलानींसोबत काम केले आहे. या दहा वर्षांच्या काळात मानशिंदे यांनी नागरिक आणि गुन्हेगारी कायद्याचा अभ्यास केला. तसेच राजकीय नेते, अभिनेते आणि इतर प्रसिद्ध व्यक्तींची प्रकरणे त्यांनी सांभळली आहेत.
मुंबईमधील एक प्रमुख वकील आणि एक विश्वासू सेलिब्रिटी वकील असल्याने मानशिंदे वकीलपत्र घेण्यासाठी मोठी फी घेतात. बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार मानशिंदे खटला लढण्यासाठी एका दिवसाचे दहा लाख रुपये घेतात.