विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या तिसऱ्यया लाटेत लहान मुलांना धोका आहे, हे कळल्यापासून भारतीयांचे टेंशन वाढले आहे. पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. पण मुलांवर तिसऱ्या लाटेचा नेमका कसा परिणाम होईल, याबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि एम्सने एक सर्वेक्षण केले आहे. त्यात दोन्ही संस्थांनी तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असा दिलासादायक निष्कर्श काढलेला आहे.
वयस्कांच्या तुलनेत मुलांमध्ये सार्स–सीओव्ही-2 चा सिरो पॉझिटिव्हिटी रेट जास्त होता, असे सर्वेक्षणात आढळून आले. हे अध्ययन देशातील पाच राज्यांमध्ये करण्यात आले. सार्स कोव्ही-2 चा सिरो पॉझिटिव्हिटी रेट मुलांमध्ये वयस्कांच्या तुलनेत जास्त आढळून आला त्यामुळे दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाचा फटका बसेल, अशी शक्यता मुळीच नाही.
सिरो–पॉझिटिव्हिटी म्हणजे रक्तात असलेली एक विशिष्ट्य प्रकारची अँटीबॉडी होय. त्यासाठी 4 हजार 509 मुलांना सर्वेक्षणात सामील करण्यात आले. 2 ते 17 वर्षे वयोगटातील 700 आणि 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या 3 हजार 809 मुलांचा समावेश होता. येत्या दोन महिन्यांत या सर्वेक्षणाशी संबंधित आणखी काही निष्कर्ष पुढे येण्याची शक्यता आहे.
ग्रामीणमध्ये वेगळे चित्र
हे सर्वेक्षण शहर आणि ग्रामीण अश्या दोन भागांमध्ये करण्यात आले. यात शहरी भागात सिरो पॉझिटिव्हिटी दर ग्रामीणच्या तुलनेत कमी आढळली. पण याचा अर्थ ग्रामीण भागातील मुलांना कोरोनाचा धोका अधिक संभवतो असे हे सर्वेक्षण म्हणत नाही.
तरीही सरकार अलर्टवर
सर्वेक्षणातील निष्कर्ष दिलासादायक असला तरीही सरकार व खासगी रुग्णालय प्रशासन तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सतर्क झाले आहेत. आता सरकारने मुलांमध्ये संक्रमणाची संख्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नोंदणीचे आदेश दिले आहेत. मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी आरोग्य सेवकांना स्वतःची क्षमता वाढवावी लागणार आहे.