वॉशिंग्टन – चीनच्या वुहान शहरात कोविड-१९ ची उत्पत्तीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला ठोस पुरावे मिळाले नसले तरी, सीएनएनच्या एका वृत्तामध्ये दावा करण्यात आला आहे की, चौकशी पथकाला डिसेंबर २०१९ रोजी कोरोना विषाणूचा व्यापक फैलाव झाल्याचे ठोस पुरावे मिळाले होते.
रक्ततपासणी न झालेल्या हजारो रुग्णांचे रक्ताचे नमुने त्वरित उपलब्ध करण्यास सांगण्यात आल्याचं सीएनएनच्या वृत्तात म्हटलं आहे. २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचे संकेत मिळाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या दलाचे चौकशीप्रमुख पीटर बेन एम्बार्क यांनी सीएनएनला एका मुलाखतीत सांगितलं.
वुहानमध्ये डिसेंबरपूर्वीच कोरोना विषाणूचे अनेक स्ट्रेन होते अशी पुष्टीही प्रथमच करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये चीनमध्ये पोहोचलेल्या पथकानं कोविडचा प्रसार कसा झाला, त्याचे सुरुवातीचे बिंदू शोधण्यासाठी जवळपास चार आठवडे तपास केला आहे.
तसंच कोरोनाचा संसर्ग झालेल्या पहिल्या रुग्णाचीही पथकानं भेट घेतली. कुठेही प्रवास न केलेल्या ४० वर्षीय व्यक्तीमध्ये ८ डिसेंबर २०१९ रोजी संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं.
डिसेंबर २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संस्थेनं चीनच्या वुहानमध्ये निमोनिया झालेल्या रुग्णांबाबत माध्यमांच्या वृत्तांची दखल घेतली होती. नंतर या विषाणूला नॉवेल कोरोना असं नाव देण्यात आलं.