इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे लागते, पालकांचे थोडे दुर्लक्ष झाले तर त्यातून दुर्घटना घडू शकते. अशा अनेक दुर्घटना घडल्याचे सध्याच्या काळात दिसून येते. खेळतांना बालक काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे त्यातून अपघात घडून दुर्दैवी मृत्यू देखील वाढल्याचे आढळले आहे.
विशेषतः पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू खेळणी गिळल्याने मृत्यू, रस्त्यावर सायकल चालवताना अपघात होणे, धारदार शस्त्र घेऊन खेळणे यासारखे प्रकार यातून मोठे अपघात घडतात. त्यातच उत्तर प्रदेशात एका दुर्दैवी घटनेमध्ये बालकांनी खेळताना वडिलांची खरोखरची बंदूक हातात घेऊन गोळ्या झाडल्या असता त्यातच त्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौच्या ठाकूरगंजमध्ये रायनगर येथील रहिवासी मोहम्मद फरीद दुबग्गा हा भाजी मंडईत एजंट आहे. फरीद यांचा आठ वर्षीय मुलगा अली जैद हा सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घरात खेळत होता. यावेळी त्यांना बेडवर वडिलांची बंदूक दिसली. त्यामुळेतो बंदुकीने बहिणीसोबत खेळू लागला. यादरम्यान अचानक त्याच्याकडून गोळी झाडण्यात आली. गोळ्यांचा आवाज ऐकून त्याची आई आसिया खोलीत शिरली. तेव्हा आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून ती रडली. त्याचवेळी मुलगी फहियाही रडू लागली. शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाला ट्रॉमा सेंटरमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
तपासात समोर आले की, या घटनेच्या काही तास आधी अली जैदचे वडील मोहम्मद फरीदचे शेजाऱ्याशी भांडण झाले, त्यावर त्याने परवाना असलेली बंदूक काढून शेजाऱ्याला धमकावले. त्या नंतर बंदूक खोलीत ठेवण्यात आली. भांडणानंतर शेजाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी फरीदला पोलीस ठाण्यात नेले होते, त्यादरम्यान मुले बंदुकीशी खेळू लागली आणि हा अपघात झाला.
या प्रकरणी हत्या नसून निष्काळजीपणे बंदुक ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरीदचा परवाना रद्द करण्याची शिफारसही करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी, पोलिसांचे म्हणणे आहे की भांडणाची माहिती मिळताच पथक तेथे गेले तेव्हा ते फरीदच्या घरातही गेले परंतु त्यानंतर बंदूक सापडली नाही. पुराव्याच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीसांनी सांगितले.