विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेचा विळखा हळूहळू सैल होत आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्यामुळे केंद्रासह राज्य सरकारांनी लसीकरणावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी लशीचा तुटवडा भासत असला तरी लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे मिळेल तिथून लस घेण्याचे नियोजन लोक करत आहेत. त्यातच परदेशात शिक्षणासाठी जायचे असल्यास लसीकरण करणे अनिवार्य असल्याने विद्यार्थी लसीकरणासाठी प्राधान्य देत आहेत. देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन लशींचे डोस दिले जात आहे. आता रशियाची स्पुतनिक लसही मिळत आहे. परंतु कोवॅक्सिन आणि स्पुतनिक लस घेणार्या विद्यार्थ्यांसोमर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
भारत बायोटेक या भारतीय कंपनीने बनवलेल्या कोवॅक्सिन लशीला तसेच रशिच्या स्पुतनिक लशीला जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लस घ्यावी लागणार आहे. अशी घटना कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेल्या २५ वर्षीय मिलोनी दोषीसोबत घडली आहे. ती पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी गेली आहे. तिने कोवॅक्सिन लशीचे दोन डोस घेतले आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेकडून लशीला परवानगी मिळाली नसल्याने तिला पुन्हा लसीकरण करण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.
पुन्हा लस किती सुरक्षित
एका लशीचे दोन डोस घेतल्यानंतर दुसर्या लसीचा डोस घेणे किती सुरक्षित आहे, असा प्रश्न मिलोनीसह इतर विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. अनेक विद्यार्थ्यांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत डॉक्टर किंवा सशोधकांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.