मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जर तुम्ही स्कूटर खरेदी करण्यास उत्सुक असाल आणि पेट्रोल स्कूटर घ्यावी की इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करावी याबाबत तुमचा संभ्रम होत असेल, तर या बातमीमुळे तुमचा संभ्रम दूर होण्यास मदत मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही आपली आवडती दुचाकी घेऊ शकणार आहात.
पेट्रोल स्कूटर – फायदे आणि तोटे
पेट्रोल स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा स्वस्त असते. तर साधारण इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत अधिक महाग असतात. परंतु सध्या बाजारात आता स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरही उपलब्ध आहेत. परंतु ग्राहक त्यांच्या रेंजबद्दल जास्त समाधानी दिसून येत नाहीत. पेट्रोल स्कूटर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात नादुरुस्त झाली तरी तुम्हाला अगदी सहज मॅकेनिक मिळू शकतो. पेट्रोल स्कूटरसाठी पेट्रोल कुठेही सहज उपलब्ध होते. कोणत्याही शहरात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले जाऊ शकते. पेट्रोल स्कूटरद्वारे तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास सहज करू शकता.
पेट्रोल स्कूटरची रनिंग कॉस्ट जास्त आहे आणि खूप वेगाने महाग होत आहे. पेट्रोल स्कूटरची वेळोवेळी सर्व्हिसिंग करावी लागते. त्याला लागणारा खर्चही जास्त असतो. स्कूटरचा मेंटेनन्स जास्त आहे. पेट्रोल स्कूटमधून निघणारा धूर पर्यावरणासाठी खूपच धोकादायक असतो.
इलेक्ट्रिक स्कूटर – फायदे आणि तोटे
इलेक्ट्रिक स्कूटरला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. इलेक्ट्रिकल स्कूटरने डिझेल आणि पेट्रोलवर अवलंबित्व कमी होते. तर दुसरीकडे वाहनांमधून निघणारा धूर कमी करण्यात पर्यावरणाची मदत करते. इलेक्ट्रिक स्कूटरची रनिंग कॉस्ट जवळपास ५० पैसे प्रति किलोमीटर असते. तर इलेक्ट्रिक स्कूटरचे सर्व्हिसिंग शुल्क कमी होते.
पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटर सध्या खूप महाग आहे. इलेक्ट्रिक स्कूटर नादुरुस्त झाली तर त्याचे मॅकेनिक सहज मिळत नाहीत. इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी जास्त पायाभूत सुविधा विकसित झालेल्या नाहीत. रस्त्यातच जर स्कूटर बंद पडली तर पायपीट केल्याशिवाय पर्याय नाही. इलेक्ट्रिक स्कूटरने लांब पल्ल्याचा प्रवास करू शकत नाही. डिस्चार्ज झाल्यावर प्रत्येक ठिकाणी त्याचे चार्जिंग स्टेशन नाहीत.