विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिन या लशीला तशी अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. शिवाय ही लस घेणाऱ्यांची संख्याही देशात कमीच आहे. पण आता एका संशोधनातून कोवॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड जास्त प्रभावी आहे, असा दावा करण्यात आला आहे. कारण कोविशिल्ड हे कोवॅक्सिनच्या तुलनेत जास्त अँटीबॉडीज तयार करते, असे या संशोधनातून मांडण्यात आले आहे.
अमेरिकेसारख्या देशांनी तर कोवॅक्सिनच्या उपयुक्ततेबाबत शंका उपस्थित केली आहेच, मात्र हे संशोधन भारतात करण्यात आल्याने त्याकडे तटस्थपणे बघण्याची वेळ आली आहे. या संशोधनात डॉक्टर्स आणि नर्सचा समावेश करण्यात आला होता. या सर्वांनी कुठल्याही एका लसीचा डोस घेतलेला होता.
दोन्ही लस प्रभावी आहेत, मात्र कोविशिल्डचा अँटीबॉडी तयार करण्याचा रेट जास्त आहे, असे निदर्शनास आले आहे. ५५२ आरोग्य सेवकांपैकी (३२५ पुरुष व २२० महिला) ४५६ लोकांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला होता आणि ८६ लोकांनी कोवॅक्सिन घेतले होते. त्यानंतर ७९.३ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या. यातील ८६.८ टक्के अँटीबॉडिज कोविशिल्ड घेणाऱ्यांमध्ये आणि ४३.८ टक्के कोवॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये तयार झाल्या. कोरोना व्हायरस व्हॅक्सीन-इनडक्टेड अँटीबॉडी टायटर (कोव्हॅट) यांनी हे संशोधन केले.