विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पहिल्या लाटेदरम्यान एका व्यक्तीद्वारे एका दिवसात २० ते ३० लोकांना संसर्ग करण्याची क्षमता असणारा अल्फा व्हेरिएंट (अवतार) भारतासह जगभरात सर्वात जास्त प्रमाणात आढळत होता. आतापर्यंतच्या आठ लाखांहून अधिक सिक्वेन्सिंगमध्ये अल्फा व्हेरिएंट असल्याचा दुजोरा मिळाला आहे. डेल्टा व्हेरिएंट यापेक्षा अनेक पटीत पसरतो. शिवाय ज्यांच्यामध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडी विकसित झालेल्या आहेत, त्यांनाही डेल्डा व्हेरिएंटची बाधा झाली आहे. दुसर्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरिएंट जगभरात झालेल्या सात लाखांहून अधिक सिक्वेन्सिंगमध्ये आढळला आहे.
भारतात सध्या २८ प्रयोगशाळांमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग सुरू आहे. भारत सरकारचा डीबीटी विभाग आणि नवी दिल्लीतील आयजीआयबी संस्थांच्या देखरेखीखाली सिक्वेन्सिंगचे काम सुरू आहे. आयजीआयबीचे डॉ. विनोद स्कारिया सांगातात, विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर नुकत्याच झालेल्या संशोधनात आढळले की, कोरोनाचा एक व्हेरिएंट जनआरोग्य आणि अंटिबॉडी मिळविलेल्या लोकसंख्येसाठी आव्हानात्मक असू शकतो. काही दिवसांपूर्वी बिटा व्हेरिएंटमध्ये जे म्युटेशन झाले, तेच डेल्टामध्येही झाले. त्याच्यातून डेल्टा प्लस व्हेरिएंट समोर आला. डेल्टा प्लसचे रुग्ण कमी असले तरीही त्याच्यावर नजर ठेवणे खूप आवश्यक आहे.
या व्हेरिएंटनी केला विद्ध्वंस
अल्फा
आतापर्यंत जगात फैलावलेल्या नऊ व्हेरिएंटपैकी अल्फाचा सर्वाधिक फैलाव झाला होता. हा व्हेरिएंट सर्वात आधी ब्रिटेनमध्ये आढळला होता. आतापर्यंत ८,८५,७२२ नमुन्यांची सिक्वेंन्सिंगमध्ये हा व्हेरिएंट असण्याला दुजोरा मिळाला होता. जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसी यांनी या व्हेरिएंटला घातक असल्याचे जाहीर केले होते. अल्फामध्येच एक व्हेरिएंट म्युटेशन झाले होते. तोसुद्धा ब्रिटेनमध्येच आधी सापडला. आता जगातील ९० हून अधिक देशांमध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे. दोन्ही गंभीर श्रेणीमध्ये मोडतात.
गॅमा
सर्वात आधी ब्राझीलमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट आता जगातील ३७,४१६ सिक्वेन्सिंगमध्ये आढळला आहे. ६५ हून अधिक देशात तो सापडला आहे. या व्हेरिएंटमध्ये आणखी दोन म्युटेशन झाले आहेत. परंतु त्याने बाधित झालेले रुग्ण जास्त आढळले नाहीत. या तिन्ही व्हेरिएंटना डब्ल्यूएचओ आणि सीडीसी यांनी गंभीर श्रेणीत ठेवले आहे.
बिटा
दक्षिण अफ्रिकेत सर्वात आधी सापडलेला हा व्हेरिएंट आतापर्यंत जगातील ८० हून अधिक देशात आढळला आहे. जगभरात २४,५२३ नमुन्यांच्या सिक्वेन्सिंगमध्ये हा व्हेरिएंट सापडला आहे. त्याच्यात एकच म्युटेशन झाले होते परंतु त्याने बाधित झालेले रुग्ण अधिक प्रमाणात आढळले नाहीत. हेच म्युटेशन डेल्टामध्ये झाले आहे. त्याचे रुग्ण आता आढळत आहेत. बिटासुद्धा गंभीर श्रेणीत आहे.
डेल्टा
सर्वात आधी भारतात सापडलेल्या डेल्टा व्हेरिएंट आणि त्यामध्ये दोन म्युटेशन झाल्यानंतर तो तिन्ही गंभीर श्रेणीत आला आहे. आतापर्यंत ८० हून अधिक देशांमध्ये हा व्हेरिएंट सापडला आहे. डेल्टा व्हेरिएंट ६४,४४९ नमुन्यांमध्ये आढळला आहे. तर डेल्टा प्लस १५५ आणि एवाय२ व्हेरिएंट ८७ नमुन्यांत आढळला आहे. हा व्हेरिएंट तिन्ही गंभीर श्रेणीत मोडतो.
कोरोना विषाणूचे हे सर्व अवतार भारतात आढळले आहेत. त्याशिवाय ईटा, कापा, लोटा व्हेरिएंटसुद्धा आहेत. त्यांच्यावर संशोधक अभ्यास करत आहेत. लवकरच त्यांच्याबाबत अधिकृत जिनोमिक सर्विलांस बुलेटिन जारी केले जाणार आहे.