विशेष प्रतिनिधी, मुंबई
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे केरळ, महाराष्ट्र, गुजरातसह पाच राज्यांवर तोक्ते चक्रीवादळ तयार झाले आहे. साधारण १८ मेपर्यंत हे वादळ भारतीय किना-यावर आदळण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मदत आणि बचावकार्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका असलेल्या पाच राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) ५३ तुकड्यांना तैनात करण्यात आल्या आहेत. झाडे, विजेचे खांब कापणे, बोट आणि बचाव कार्यातील वैद्यकीय उपकरणांसह प्रत्येक तुकडीत ४० जवान तैनात आहेत.
राज्यांमधील हवामान विभाग आणि भारतीय हवामान विभागाने आगामी दिवसांच्या दृष्टिने दिशानिर्देश जारी केले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या २४ तासात चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. १६ ते १९ मेदरम्यान चक्रीवादळ अक्राळविक्राळ रूप धारण करून ठिकठिकाणी विद्ध्वंस करण्याची शक्यता आहे. १८ मे रोजी ते गुजरातच्या किनाऱ्यावर आदळण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप येथे १५ मेस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सध्या हे चक्रीवादळ कुठे आहे आणि त्याचा पुढचा प्रवास कसा आहे याबाबत सांगत आहेत भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांघी भुते (बघा व्हिडिओ)
https://www.facebook.com/watch/?v=884615975449108