नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस खासदारांनी चांगलेच खिंडीत पकडल्याचे दिसून येत आहे. कारण, भाजप खासदार संसदेच्या कानकाजात सहभागी होत नाहीत. ते गैरहजर राहतात. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना चांगलेच खडसावले. त्यामुळे भाजप खासदारांच्या उपस्थितीत लक्षणीय फरक पडला आहे. मात्र, इतरांना उपस्थित रहायला सांगणारे पंतप्रधान मोदी सध्या कुठे आहेत, असा प्रश्न काँग्रेस खासदारांनी उपस्थित केला आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले तसे पंतप्रधान मोदी हे अवघे एकच दिवस संसदेत उपस्थित राहिले आहेत. त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत. ते सध्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित करणारे फलक काँग्रेस खासदारांनी आज संसदेत दाखविले. त्यामुळे ती बाब संसदेसह देशभरात विशेष चर्चेची ठरत आहे.
देशातील पाच राज्यांमध्ये येत्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी हे सध्या या राज्यांचा दौरा करुन सभा घेत आहेत. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या संसदेच्या सभागृहांमध्ये पंतप्रधान अनुपस्थित राहत आहेत. ही बाब चांगली नसल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.