इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध अनेक पक्ष असा सामना आहे. त्यामुळेच तेथे प्रचार कार्याला मोठा वेग आला आहे. याच प्रचारात अनेक गमतीजमतीही घडत आहेत. असाच एक मोठा गंमतीदार किस्सा घडला आहे.
समाजवादी पक्षाच्या प्रचार वाहनावर चक्क भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विजयाची गाणी वाजल्याने नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले असून याबाबत जोरदार चर्चा होत आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचा उत्साह एवढा वाढला आहे की, विरोधी पक्षांच्या प्रचाराच्या वाहनासोबतच अनेक ठिकाणी समर्थक योगी-मोदींच्या बाजूने घोषणा देत आहेत. त्यांचा जयजयकार करत आहेत.
अशीच एक घटना औरैया जिल्ह्यातून समोर आली आहे, तेथे समाजवादी पक्षाच्या प्रचाराच्या वाहनात योगींच्या विजयाचे गाणे वाजत होते. हे प्रकरण सध्या चर्चेत आले असून त्याचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. सपाच्या प्रचार वाहनात योगींच्या विजयाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. सदर प्रचाराचे वाहन सपा नेते डॉ. नवन किशोर यांचे असून ते बिधुना मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
बघा खालील गंमतीदार व्हिडिओ
https://twitter.com/rampathaklic/status/1475121823649988612?s=20
याबाबत माहिती मिळताच डॉ.नवल किशोर यांनी या प्रकरणाची माहिती एरवाकत्रा पोलीस ठाण्यात दिली. त्यांनी सांगितले की, प्रचाराचे वाहन पहारपूर गावात गेले होते. तेथे चालक खाली उतरला असताना डीजे कर्मचाऱ्याला गावातील काही लोकांनी ओलिस करून त्याच्या मोबाईलला डीजे जोडून त्यात योगींच्या विजयाचे गाणे वाजवले.
गावातील नागरिकांनी त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. याबाबतची माहिती मिळताच एरवाकात्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तक्रारीबाबत पक्षाला कोणतीही माहिती नाही. त्याच वेळी दुसऱ्या एका घटनेत झाशीमध्ये काँग्रेसने रविवारी ‘मी लढू शकतो’ या घोषणेखाली मॅरेथॉन दौडचे आयोजन केले होते. मुलींसाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन शर्यतीत अडचणीत आलेल्या मुलींनी पंतप्रधान मोदी आणि योगींचा जयजयकार केला.