विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
गेल्या दीड वर्षात कोरोना साथीच्या आजारामुळे केवळ उद्योग, व्यवसायच नव्हे, तर शालेय मुलांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याकरिता शाळा पुन्हा सुरू कराव्या लागतील, यात लसीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, तसेच लसीकरण हा त्यासाठी एकमेव मार्ग आहे, असे मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, मुलांसाठी कोरोना लस उपलब्ध होणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असेल. यामुळे शाळा उघडण्याचा आणि अन्य शैक्षणिक कार्याचा मार्ग स्पष्ट होईल. भारत आणि बायोटेकच्या लस या तिसऱ्या टप्प्यातील वय ६ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे. औषध नियामकांच्या मंजुरीनंतर त्या काळात भारतात लसी उपलब्ध होऊ शकतात. त्यापूर्वी फायझरची लस मंजूर झाली तर ती देखील मुलांसाठी एक पर्याय असू शकते.
डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, जर झायडसची लस मंजूर झाली तर ते आणखी एक पर्याय असेल. ते म्हणाले की मुलांमध्ये कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असून काहींमध्ये मात्र लक्षणेही दिसत नसतात. असे असूनही, अद्याप कोरोना विषाणू संसर्ग पसरवू शकतात. सरकारने अलीकडेच इशारा दिला आहे की, कोरोनाव्हायरसने अद्यापपर्यंत मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु विषाणूच्या मध्ये काही बदल झाला किंवा साथीच्या रोगाच्या गतीत बदल झाल्यास मुलांमध्ये संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू ठेवायला हवी .