सांगली : राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढल्याने सर्वत्र हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. अशा परिस्थितीत मध्यरात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. आर. आर. पाटील ( आबा ) यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन करून सांगितले की, ‘ रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे. ‘ त्यामुळे अजित पवारांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरुन घेतला. त्यांनतर यातील २३ जम्बो टाक्या आणि २ छोटया टाक्यामध्ये असलेला ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेल्या धडपडीचे कौतुक होत आहे.
अनेक शहरामध्ये विविध ठिकाणी
ऑक्सिजनसाठी हॉस्पिटल, प्रशासन यांची तारेवरची कसरत होत आहे. त्यातच सांगली जिल्ह्यात देखील काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक राहत आहे. त्यामुळे प्रशासन ऑक्सिजन टँकर मिळवण्यासाठी धावाधाव होते. अशातच कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने तासगावच्या आमदार सुमन पाटील, आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून सांगलीमधील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. तासगावातही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले.