नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. सध्या इंधनाच्या दरात कोणताही बदल होणार नाही. असे उद्योग क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ द ऑइल प्रोडक्शन कंट्रीज (OPEC+)ने कच्च्या तेलाच्या उत्पादनात मोठी कपात केल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. अशा स्थितीत, भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील सुधारणा तूर्तास पुढे ढकलण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
जगातील सर्वोच्च तेल उत्पादक देशांनी तेलाच्या किमती सुधारण्यासाठी नोव्हेंबरपासून दररोज २ दशलक्ष बॅरल उत्पादनात कपात करण्याचे मान्य केले. कच्च्या तेलाच्या किंमती अलीकडेच युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धपूर्व पातळीपर्यंत घसरल्या होत्या. अलिकडच्या आठवड्यात तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे भारताचे आयात बिल कमी करण्यात तसेच सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर होणारा तोटा मर्यादित करण्यात मदत झाली.
ओपेक प्लसच्या निर्णयापूर्वी डिझेलवरील तोटा ३० रुपये प्रति लिटरच्या शिखरावरून ५ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आला होता, तर तेल कंपन्यांनी पेट्रोलवर किरकोळ नफा कमावण्यास सुरुवात केली होती. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यामुळे डिझेल विक्रीचे नुकसान होईल आणि पेट्रोलवरील मार्जिन कमी होईल. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय तेलाच्या किंमती थेट देशांतर्गत किंमत ठरवतात.
When Petrol Diesel Prices Will Reduce
Fuel Economy Business