मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे अनेक निर्णय घेतले, त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे ‘नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’. हे धोरण अद्यापहू लागू झालेले नाही. या धोरणात असंख्य अमुलाग्र बदल सूचविण्यात आले आहेत. कालसुसंगत अशा स्वरुपाचे हे धोरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, ते नक्की कधी लागू होणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अखेर यासंदर्भात आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनीच स्पष्टोक्ती केली आहे.
विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त नवे शैक्षणिक धोरण राबवण्याची तयारी संपूर्ण देशभर करण्यात आली आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता शालेय अभ्यासक्रमात ‘जवानांच्या शौर्यकथां’चा समावेश करण्यात येणार आहे. गेली दोन ते तीन वर्ष करोना संकटामुळे देशभरातील अनेक शाळा बंद होत्या. त्यामुळे नवे शैक्षणिक धोरण राबवणे सरकारला शक्य झाले नाही. आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवा अभ्यासक्रम राबवला जाणार असल्याचे संकेत आहेत.
अभ्यासक्रमात बदल करून त्यांत जवानांच्या शौर्यकथांचा समावेश करण्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सैन्यदलांतील अधिकारीही उपस्थित होते. मागील वर्षात २१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत वीरगाथा प्रकल्पांतर्गत स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात आठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना निबंध, कविता, रेखाचित्रे आणि ‘मल्टिमीडिया’ सादरीकरणाच्या माध्यमातून शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या जीवनावरील प्रेरणादायी कथांचे सादरीकरण करण्यास सांगण्यात आले होते.
भविष्यात या स्पर्धेचे स्वरूप अधिक व्यापक होणार असून एक कोटी विद्यार्थी सहभागी व्हावेत, असे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात सैनिकांच्या शौर्यकथांचा समावेश करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात आधीपासूनच स्वातंत्र्योत्तर युद्धांतील वीर जवानांच्या शौर्यगाथांचा समावेश असल्याचे शिक्षकांनी सांगितले. परमवीर चक्र, अशोक चक्र यांसह युद्धात असाधारण कामगिरी करणाऱ्या जवानांच्या कथा विद्यार्थ्यांना शिकवून प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अभ्यासक्रमात बदल होईलच असे नाही. मात्र त्यात नव्या काही शौर्यकथांचा समावेश केला जाऊ शकतो, विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रति जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमात जवानांच्या शौर्याचे धडे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी सशस्त्र दलांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमात जवानांचे धाडसी कार्य आणि सशस्त्र दलांमधील जवानांच्या बलिदान कथांचा समावेश केला जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे नवीन शैक्षणिक धोरण नुकतेच केंद्र शासनाच्या मंत्रीमंडळाने संमत केले आहे. पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने त्याची देशभर अंमलबजावणी होईल. त्यातील अंमलबजावणीचे टप्पे, येणाऱ्या संभाव्य अडचणी व संस्था, प्रत्यक्ष शाळा अथवा महाविद्यालय, विद्यार्थी यांनी करावयाच्या गोष्टी व शासनाने करावयाच्या गोष्टी या दोन्हीचा तपशिलात विचार केला पाहिजे.
शिक्षण हा केंद्र व राज्य या दोन्हीच्या संयुक्त सूचीतील विषय आहे. त्यामुळे केवळ केंद्राने धोरण घोषित करून त्याची अंमलबजावणी होणार नाही. प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या राज्यात हे नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी योग्य ते कायदे पारित करून घेतले पाहिजेत. शिक्षण खात्यामध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजे, असे सांगण्यात येत आहे.
When New Education Policy Will Implement Minister Says
Dharmendra Pradhan Curriculum