नवी दिल्ली – पीएम काका… पीएम काका, मी इथं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा आवाज ऐकू येताच ते स्तब्ध झाले आणि आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. एका व्हिलचेअरवर एक मुलगी बसली असून, तिच्याशेजारी तिची आई उभी आहे हे त्यांनी पाहिले. पंतप्रधानांनी विचारले, ‘अरे इथं कशी आली’? तर उत्तर मिळाले, ‘मी तुम्हाला भेटायला आले आहे पीएम सर. मला गाणे गायची खूप आवड आहे. मी तुम्हाला एक गाणे ऐकवू शकते का’? हे ऐकून पंतप्रधान स्मितहास्य करत म्हणाले, ‘हो अवश्य, मी अवश्य ऐकेन गाणं’. मुलीने गाणं ऐकविण्यास सुरुवात केली. ‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी… हे गाणं ऐकून पंतप्रधान भावूक झाले.
मुलीचे नाव छवी असून, ती विशेष वर्गात मोडते असे पंतप्रधानांना कळाले. ती नुकतीच १८ वर्षांची झाली. कोरोनाची लस घेण्यासाठी ती दिल्लीतील डॉ. राममनोहर लोहिला रुग्णालयात आली होती. पंतप्रधानांनी तिला शाबासकी दिली आणि तिच्या आईचेही कौतुक केले.
पंतप्रधान थोडे पुढे जाताच, त्यांना पुन्हा ऐकू आलेल्या आवाजामुळे ते थांबले. ‘पीएम काका… थोडे थांबा’, मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायची आहे’. पीएम पुन्हा म्हणाले, हो नक्कीच. कोण घेणार सेल्फी सांग. एवढे बोलून पीएम छवी आणि तिच्या आईजवळ पुन्हा आले. फोटो घेतल्यानंतर त्यांनी छवीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी १०० कोटीवा डोस देणार्या क्रिस्टिना या परिचारिकेसोबत चर्चा केली. क्रिस्टिना यांना लसीकरणाच्या अनुभवाबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, सर मी या वर्षी फेब्रुवारीमध्ये लस घेतली होती. दुसर्या लाटेत लशीमुळेच माझा जीव वाचला होता. ईशान्य भारतात माझे गाव आहे. तेथील सर्व ग्रामस्थ घाबरलेले होते. पण जेव्हा मी माझा अनुभव त्यांना सांगितला तेव्हा संपूर्ण गाव लस घेण्यासाठी तयार झाले.
क्रिस्टिना यांची भेट घेतल्यानंतर पीएम मोदी यांनी बाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले, खूप मोठी लढाई तुम्ही लढत आहात. तुमचे हे सहकार्य संपूर्ण देश लक्षात ठेवणार आहे. पंतप्रधानांनी विचारले, तुमच्या घरी सगळे चिंतीत असतील. तुम्ही कोणत्या गावातील रहिवासी आहात? सुरक्षारक्षक म्हणाला, हो सर, कुटुंबासह येथील ड्युटीसुद्धा महत्त्वाची आहे. मी गोरखपूर येथीर रहिवासी आहे. तुम्ही देशातील सर्व सुरक्षारक्षकांना सन्मानित केले आहे. एक मिनिट चाललेल्या या चर्चेत पंतप्रधानांनी तीन वेळा सुरक्षारक्षकाच्या खांद्यावर हात ठेवत शाबासकी दिली आणि प्रोत्साहन दिले. यादरम्यान पंतप्रधान एका कॉम्प्युटर ऑपरेटरलाही भेटले आणि त्याच्या कामाबाबत माहिती घेतली.